If there is a 'source code', why spend maintenance? | ‘सोर्स कोड’ असेल, तर देखभाल-दुरुस्तीचा खर्च कशासाठी?
‘सोर्स कोड’ असेल, तर देखभाल-दुरुस्तीचा खर्च कशासाठी?

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाला पत्र देऊनही कार्यवाही नाही तंत्रज्ञान हाताळण्याबाबतचा विचार नाही

संतोष मिठारी ।
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील काही संगणक प्रणालींचा सोर्स कोड विकत घेऊनही त्यावर वार्षिक देखभाल-दुरुस्तीचा खर्च कशासाठी करण्यात आला आहे? त्यासह प्रणालीत बदल केल्यास त्याचा खर्च स्वतंत्रपणे संबंधित कंपनीला देण्यात आला असल्याची तक्रार विद्यार्थ्यांतून होत आहे.

परीक्षा विभागातील कामकाजासाठी वापरण्याकरिता संगणक प्रणाली विकत घेताना तिचा सोर्स कोड घेतला आहे. हा कोड विकत घेताना असा विचार असतो की, जर भविष्यात त्या संगणक प्रणालीमध्ये काळानुसार काही बदल करायचा असेल, तर तो करता येईल. पुढील वार्षिक देखभाल-दुरुस्तीचा खर्च येऊ नये; पण असे काहीच झालेले नाही; कारण दरवर्षी वार्षिक देखभाल-दुरुस्तीचा खर्च दिला जातो. त्या संगणक प्रणालीत काही बदल करायचा असेल, तर त्या कंपनीला त्याचे वेगळे पैसे दिले जातात. मग, महागातील सोर्स कोड विद्यापीठाने विकत घेतलाच का? हा प्रश्न उपस्थित होतो. ज्यावेळी सोर्स कोड विकत घेतला जातो, त्यावेळी त्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरायचे, हा विचार करावा लागतो.

आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या तंत्रज्ञानाची माहिती आहे का आणि त्यांना ते हाताळता येते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र, विद्यापीठात त्याचा विचार केला नसल्याचे दिसून येते. आठ वर्षांनंतरही आर्थिक खर्च करून काही कर्मचाऱ्यांना या प्रणालींचे तंत्रज्ञान शिकविण्यात आले आहे. त्याचा विद्यापीठाला फायदा झालाआहेका?याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यासारखे चित्र आहे.

धक्कादायक उत्तरे
पीएच.डी. प्रवेश परीक्षेची प्रक्रिया पूर्ण करीत असताना शिवाजी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीतील त्रुटी, चुकांमुळे विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाची जाणीव झाली. त्याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम गेल्या दीड वर्षापासून केले असल्याचे आपटेनगर येथील नागरिक अभिजित पोतदार यांनी
सांगितले.

संगणक प्रणाली तयार करण्यासाठी एका कंपनीला किती कालावधी दिला होता? प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या कंपनीने कागदपत्रे जमा केली का? पूर्णत्वाची चाचणी झाली का? याबाबतची माहिती मी माहिती अधिकाराखाली मागविली. त्यावर ही धोरणात्मक बाब असल्याने उत्तर देऊ शकत नाही.

कोणतीही कागदपत्रे आढळून येत नाहीत, अशी धक्कादायक उत्तरे मिळाली. त्रास झालेल्या आणखी काही विद्यार्थ्यांसह मिळून आम्ही संगणक केंद्रातील कामकाजाबाबतची माहिती कुलगुरू, प्र-कुलगुरू,
परीक्षा मंडळाचे संचालक, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यापीठ प्रशासनाला पत्राद्वारे दिली; पण त्यावर
काहीच कार्यवाही झाली नाही. त्रुटी दूर होऊन संगणक केंद्राचे कामकाज सक्षमपणे होऊन विद्यार्थ्यांचा त्रास कमी व्हावा, इतकीच अपेक्षा आहे.


खराब मदरबोर्ड, हार्डडिस्कची माहितीच नाही
या संगणक केंद्रामार्फत विद्यापीठातील विविध विभागांमधील संगणकांच्या दुरुस्तीचे देखील काम चालते. संगणकामध्ये बिघाड झाल्यास त्याचा मदरबोर्ड अथवा हार्डडिस्क खराब झाल्याचे सांगितले जाते.
शिवाय ते संबंधित विभागाला नवीन खरेदी करण्यास सांगण्यात येते. त्यामुळे किती मदरबोर्ड, हार्डडिस्क खराब झाल्या, बदलल्या याची नोंद ठेवण्याचे काम संगणक केंद्राला करावे लागत नाही. शिवाय खराब झालेले मदरबोर्ड, हार्डडिस्कचे पुढे काय होते? त्याची माहिती दिली जात नाही. हा प्रकार गेल्यावर्षी विद्यापीठाला प्राप्त झालेल्या एका निनावी पत्रामुळे समोर आला, तरीही संगणक केंद्राच्या या कारभारात काहीच सुधारणा झाल्याचे दिसत नाही.

Web Title:  If there is a 'source code', why spend maintenance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.