Kolhapur- अनधिकृत मदरशावर कारवाई: अधिकाऱ्यांनी मुस्लिम समाजाला दिलेला शब्द पाळावा, अन्यथा..
By भीमगोंड देसाई | Updated: February 1, 2024 17:30 IST2024-02-01T17:27:09+5:302024-02-01T17:30:37+5:30
गणी आजरेकर, कादर मलबारी यांचा इशारा

Kolhapur- अनधिकृत मदरशावर कारवाई: अधिकाऱ्यांनी मुस्लिम समाजाला दिलेला शब्द पाळावा, अन्यथा..
कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथील मदरशाचे बांधकाम मुस्लिम समाजाने स्वतःहून उतरून घेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रशासक के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित या अधिकाऱ्यांसोबत बैठकीत झालेल्या चर्चेतील शब्द पाळून प्रामाणिकपणे पाळला. मात्र मदरशाचे बांधकाम पुन्हा रीतसर परवानगी देऊन न केल्यास आणि जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिलेला शब्द नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी न पाळल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन समाजाला सोबत घेऊन भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी यांनी गुरूवारी प्रसिध्दी पत्रकातून दिला.
पत्रकात म्हटले आहे, गेल्या २५ वर्षापासून स्व - मालकीच्या जागेवर असलेल्या मदरशाच्या बांधकामासंबंधी काही हिंदुत्ववादी संघटनानी तक्रार केली. यावरून महापालिकेच्या नगररचना विभाग केवळ कागदपत्रे अपुरी असल्याच्या कारणावरून बांधकाम बेकायदेशीर ठरवत कारवाई करण्याचा प्रयत्न केला. ही कागदपत्रे पूर्ण करून एका महिन्याच्या आत पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावीत. त्यानंतर रीतसर या मस्जिदच्या बांधकामाला परवानगी देऊ असे ठोस आश्वासन महसूली कागदपत्रावर हात ठेवत तत्कालीन जिल्हाधिकारी रेखावार यांनी मुस्लिम समाजाला दिला. यामुळे मुस्लिम समाज जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेत मदरशाचे बांधकाम उतरून घेतले.
म्हणून मुस्लिम समाजाचे सहकार्य
जिल्ह्यात छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा आहे. येथील कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राहून सर्व धर्मीयांत सलोखा, बंधुभाव रहावा म्हणून मुस्लिम समाजाने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही आजरेकर, मलबारी यांनी स्पष्ट केले.