मुश्रीफसाहेबांनी पास दिल्यास नक्की ‘गोल’
By Admin | Updated: November 22, 2015 00:36 IST2015-11-22T00:26:40+5:302015-11-22T00:36:35+5:30
सतेज पाटील यांची ‘किक’ : उमेदवारी मिळवा, ‘पास’ देतोच

मुश्रीफसाहेबांनी पास दिल्यास नक्की ‘गोल’
गडहिंग्लज : मी विधान परिषदेच्या मैदानात उतरलो आहे. त्यासाठी जोरदार सराव केला आहे. मुश्रीफसाहेबांनी मला जर पास दिला तर मी त्याचे नक्कीच गोलमध्ये रूपांतर करीन, असा विश्वास माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. सतेजना पास देण्याची माझी तयारी आहे. मात्र, त्यांना काँगे्रसचे तिकीट मिळायला हवे, तरच गोल होईल; त्यामुळे त्यांनी तिकिटासाठी काँगे्रस पक्षाकडे फिल्डिंग लावावी, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी दिला. निमित्त होते, येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभाचे. आम्ही सतेज पाटील यांना नक्की पास देऊ; परंतु त्यांनी त्याअगोदर काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी जास्त सराव करावा; कारण काँग्रेसमध्ये उमेदवारी कुणाला मिळेल, हे शेवटपर्यंत सांगता येत नाही. एकदा उमेदवारी मिळाल्यावर मग आम्हाला पास देण्यात अडचण नाही, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. सध्या जिल्ह्याच्या राजकारणात विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. कोल्हापूर महापालिकेत सतेज पाटील व मुश्रीफ यांनी एकत्र येऊन सत्ता काबीज केली आहे. विधान परिषदेलाही हे दोघे एकत्र राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे. काँग्रेसमधून सतेज पाटील, पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक व प्रकाश आवाडे इच्छुक आहेत. काँग्रेसची उमेदवारी सतेज पाटील यांनाच जाहीर होण्याची शक्यता ठळक झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत गोल करण्याचा इरादा जाहीर केल्यावर त्यांना उपस्थितांतून जोरदार प्रतिसाद मिळाला. तत्पूर्वी सतीश पाटील म्हणाले, ‘आमदार मुश्रीफ व सतेज पाटील यांनी जिल्ह्यात एकत्र राजकारण करावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.’
मुश्रीफ म्हणाले, ‘सतीश पाटील यांनी व्यक्त केलेली भावना आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे आमच्या दोघांची एकत्र येण्याची तयारी आहे.’
या दोन नेत्यांतील फुटबॉलच्या मैदानावरील राजकीय ‘किक’ची सायंकाळनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. सतेज पाटील हे फुटबॉलला किक देऊन विधान परिषदेचा गोल करीत असल्याचे संदेशही फिरत राहिले. (प्रतिनिधी)