नागचिन्हाविना अपूर्णच राहिली मूर्ती
By Admin | Updated: September 25, 2015 00:25 IST2015-09-25T00:20:16+5:302015-09-25T00:25:34+5:30
अंबाबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना त्रिशताब्दी वर्ष उद्यापासून

नागचिन्हाविना अपूर्णच राहिली मूर्ती
कोल्हापूर : आद्यशक्ती आणि साडेतीन शक्तिपीठांतील देवता करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठानेच्या त्रिशताब्दी वर्षाला उद्या, शनिवारपासून प्रारंभ होत आहे. ही बाब प्रत्येक भाविकासाठी आनंददायी असली तरी नागचिन्हाविना अपूर्णावस्थेत आणि बदललेल्या रूपातील मूर्तीचे पूजन करावे लागणार, ही अत्यंत क्लेशकारक बाब आहे.
करवीरनिवासिनी अंबाबाईचे हे मंदिर अस्तित्वात असल्याचे दाखले नवव्या शतकापासून मिळत असले तरी त्यापूर्वीपासून येथे हे मंदिर आहे. शालिवाहन, यादवकालीन, अगदी आदिलशाही काळातील विविध राजांनी या देवीची आराधना केल्याचे पुरावे आहेत. प्रत्येक राजवटीच्या काळातील सुधारणांनी आजचे हे मंदिर आकाराला आले आहे. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई ही महाकाली, सरस्वती आणि लक्ष्मी या तीन स्त्री देवतांसह ब्रह्मांडाची निर्मिती केलेल्या आदिशक्तीचे स्वरूप आहे. १२ व्या शतकातील यादवराजांचा प्रधान हेमाद्री याने लिहिलेल्या ‘चतुर्वर्गचिंतामणी’ ग्रंथात या मूर्तीचे वर्णन ‘क्षेत्रे कोल्हापूंद अन्ये’ म्हणजे करवीर क्षेत्रातील महालक्ष्मी अन्य क्षेत्रांहून वेगळी असल्याचे मान्य केले आहे. तिचे मूळ स्वरूप आदिशक्ती, जगन्मातेचे आहे. ती शैव व वैष्णव या दोन्ही पंथांमधील नाही, तर शाक्त सांप्रदायातील देवता आहे.
अंबाबाईची सध्याची मूर्ती ही ११ व्या शतकातील असल्याचे मूर्ती अभ्यासक सांगतात.
सन १७०० च्या काळात मंदिरावर होणाऱ्या आक्रमणांपासून मूर्ती वाचविण्यासाठी ती एका पुजाऱ्याच्या घरात सुरक्षित ठेवण्यात आली. त्यानंतर ती कित्येक दिवस त्या पुजाऱ्याकडेच होती. माझी मूर्ती पुजाऱ्यांच्या घरी आहे. तिथून मला पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात यावे, असा दृष्टान्त नरहरभट सावगावकर यांना झाल्यानंतर त्यांनी ही गोष्ट महाराणी ताराराणी यांचे सुपुत्र शंभुराजे छत्रपती यांना पन्हाळ्यावर जाऊन सांगितली. त्यांनी सरदार हिंदुराव घोरपडे यांना मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची आज्ञा केली. त्यानुसार अश्विन शुद्ध दशमी शके १६३७ राज्याभिषेक शक ५०, दिनांक २६ सप्टेंबर १७१५ रोजी तिची मंदिरात पुनर्प्रतिष्ठापना झाली. या सगळ्या घटनाक्रमांचा उल्लेख ग. ह. खरे यांच्या महाराष्ट्रातील ४ दैवत (१९५८), मूर्तिविज्ञान (१९३९, १९५५), करवीर सरदारांच्या कैफियती (१९७१) या ग्रंथांमध्ये आहे.
त्यानुसार २६ सप्टेंबर २०१५ पासून अंबाबाई मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेच्या त्रिशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. (प्रतिनिधी)
निष्क्रियता आणि ठरवून दिरंगाई
त्रिशताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वी अंबाबाई मूर्तीचे नैसर्गिकरीत्या संवर्धन झाले असले तरी मूर्तीवर नागचिन्ह नसल्याने ती आजही अपूर्णावस्थेतच आहे. ज्या देवीची देशभरातील भाविक आराधना करतात, त्याच देवीची मूर्ती अर्धवट स्थितीत ठेवून या त्रिशताब्दी वर्षाला सुरुवात करण्यामागे श्रीपूजकांनी ठरवून केलेली दिरंगाई कारणीभूत आहे; तर जिल्हाधिकाऱ्यांनीही हे प्रकरण फारसे गांभीर्याने न घेता चालढकल केली.