लोकसहभागाचा आदर्श वस्तुपाठ : विद्यामंदिर येळाणे
By Admin | Updated: July 15, 2015 21:22 IST2015-07-15T21:22:24+5:302015-07-15T21:22:24+5:30
गुणवंत शाळा

लोकसहभागाचा आदर्श वस्तुपाठ : विद्यामंदिर येळाणे
विद्यामंदिर येळाणे ही शाहूवाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेची शाळा. १९३७ लोकसंख्या असलेले गाव. तसे गाव छोटे आणि शिक्षणाने केले नाव मोठे असेच म्हणावे लागेल. शाळेची पटसंख्या १९० इतकी आहे व पाच शिक्षक अध्यापनाचे काम करतात. सर्वांगीण गुणवत्ता विकासाची धुरा शिक्षक घेतात. त्यांच्या जोडीला पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे मोठे योगदान आहे. शिक्षणाची गुणवत्ता, शिक्षकांचे परिश्रम, शिस्त व संस्काराची शिकवण, शाळेचा उंचावलेला दर्जा यामुळे ही शाळा परिसरात महत्त्वपूर्ण ठरली आहे.शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळवलेला हा येळाणे विद्यामंदिरचा विद्यार्थी. शिष्यवृत्ती परीक्षेस सर्वच मुले बसली आणि ९० टक्के विद्यार्थी पास झाले. जिल्हा परिषद स्पर्धा परीक्षेचा निकालही शंभर टक्के लागला. शिष्यवृत्ती चाचण्या डाऊनलोड केलेल्या. त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी वातावरणनिर्मिती व पद्धती विद्यार्थ्यांना ज्ञात होत आहे.
‘ई-लर्निंग’ हा या शाळेने शालेय शिक्षणाचा आत्मा बनवला आहे. ई-लर्निंग सुविधेसाठी लोकसहभागातून एक लाख रुपये उभे केले आहेत. कॉम्प्युटर कक्ष सुसज्ज आहे. प्रोजेक्टरवर झंकार सॉफ्टवेअर डाऊनलोड केलेले आहे. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी ते उपयुक्त ठरते. ‘स्वयंअध्ययन’ हे शाळेचे त्यामुळेच वैशिष्ट्य बनले आहे. विद्यार्थी शाळा उघडतात. स्वच्छता, सफाई करतात आणि अभ्यासाकडे वळतात. पेन ड्राईव्हचा वापर करून अध्ययनाला सुलभता व सहजी उपलब्धता झाली आहे. अभ्यासक्रमीय धडे गणिते वगैरेंची.
पर्यावरणाचे संस्कार व वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून देणाऱ्या शिक्षकांनी एक नावीण्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. कल्पक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त केक, चॉकलेट न वाटता शाळेला कुंडी देण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. आर्थिक सुस्थिती असलेली मुले वाढदिवसादिवशी शाळेला ‘कुंडी भेट’ देतात व त्यामध्ये रोप लावले जाते. कुंडीवर त्या विद्यार्थ्याचे नाव लिहिले जाते. त्या कुंडीतील रोपाची देखभाल करण्याची जबाबदारी तो विद्यार्थी घेतो.
‘दातृत्व वृत्ती व दान’ यामुळे शाळा गुणवत्तेच्या शिखराकडे वाटचाल करीत आहे. श्रीपती आबा पाटील यांनी शाळेला ८ गुंठे जागा दिली आहे. रस्ता ग्रामस्थांच्या श्रमदानातून तयार केलेला. कंपाऊंड वॉल भक्कम, स्वच्छतागृहे पक्की व स्लॅबची, वॉश बेसीन हे सगळं दानशूर व्यक्तींच्या आर्थिक साह्यातून उभे राहिले आहे. फिल्टर वापरात असून, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाने प्रत्येक वर्गात फॅन बसवून दिले आहेत. एवढेच काय शिक्षकांच्या रजेच्या काळात गावातील सुशिक्षित मंडळी अध्यापनाचे काम करतात. ‘साऊंड सिस्टीम’ प्रत्येक वर्गात आहे. ती अभिमानास्पद व सोयीची सुविधा करण्यास शिक्षक पुढे आहेत. कॉम्प्युटर पुरेसे आणि पी.सी.ला इन्व्हर्टरच्या सोयीमुळे वीज नसली तर संगणक सुरू राहणे घडते. शिवाय ‘सौरऊर्जा’ सुविधा आहेच. गावची शाळा ही ‘माझी शाळा’ व ती ‘समृद्ध शाळा’ व्हावी या भावनेचा फार मोठा मानसिक सकारात्मक विचार येळाणे ग्रामस्थांनी जपलेला आहे.
औषधी वनस्पतींची लागवड व वाढ शाळेच्या परिसराची गुणवत्ता वाढविणारी असून, चांगल्या पद्धतीने राखलेली आहे. ‘आॅक्सिजन पार्क’ अगदी नेटका आहे. प्रयोगशाळा व ग्रंथालय सोयीसुविधा सुसज्जतेची, ज्यातून विद्यार्थी विज्ञानाचे व वैज्ञानिक धडे आणि पुस्तक वाचनातून कथा, कविता, बालसाहित्याचा आस्वाद घेत आहेत.
- डॉ. लीला पाटील
शाळेची वैशिष्ट्ये‘
बोलके व्हरांडे’ हे विद्यार्थ्यांना उपयुक्त व त्यावरील रेखाटन कलात्मक, रंगसंगती छान आणि ज्ञान, माहिती देणारे आहे.
डिजिटल वर्ग हे पाहत राहावे असे, आकर्षक मांडणी व ज्ञान संपर्कात राहण्यासाठी उपयुक्त असेच असून, वर्गातील शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्यांना रमवणारे आहे.
बेंचेसमुळे शाळेकडे विद्यार्थ्यांचे आकर्षण व चांगली पटसंख्या हा त्याचा परिणाम आहे. शाळेची रंगरंगोटी ही सुद्धा लोकांचे अर्थसाहाय्य व शैक्षणिक उठावातून झाली आहे.
स्नेहसंमेलन म्हणजे उत्साहाचे थुईथुई कारंजे जणू. नाट्य, नृत्य, संगीत, गायन, गीत, मिमिक्री, नाटिका वगैरे कार्यक्रम. ड्रेपरी व कार्यक्रमास खास मार्गदर्शकांचे साहाय्य घेतले जाते.
प्रोजेक्टरसुद्धा ग्रामस्थांनी दिला आहे. ‘माझी शाळा समृद्ध शाळा’ हाच दृष्टिकोन ग्रामस्थांमध्ये आहे.
मुलांचे कौतुक करण्यासाठी जवळपास पंचक्रोशी
लोटते. ४० हजार रुपये बक्षिसांसाठी ठेवल्याने
शिक्षक व विद्यार्थी खूप मेहनत घेतात.
मान्यवर व्यक्ती, व्यापारी, दुकानदार, नोकरदार, संस्थांचे प्रायोजक लाभल्याने हा कलेचा ‘सांस्कृतिक सोहळा’ म्हणजे मेजवानी ठरतो.
‘खाद्यमहोत्सव’ हा आगळा वेगळा उपक्रम. मुला-मुलींमध्ये विक्री कौशल्य वाढविण्यास मदत करणारा. मार्केटिंग युगात त्याचे बीजारोपण करणारा हा उपक्रम. यातून मुले पैशांची देवाण-घेवाण, हिशेब शिकतात.