इचलकरंजी : शहरात तीन ठिकाणी शासकीय कोविड केंद्रे सुरू असून, तेथील एकूण ६१८ बेडसंख्यांपैकी १८३ बेड सध्या शिल्लक आहेत. त्यामध्ये ६९ ऑक्सिजन बेडही उपलब्ध आहेत. परंतु या तिन्ही केंद्रांवर सेवा मात्र त्रोटक असून, ती सुधारण्याची गरज आहे. नगरपालिकेच्या कोविड केंद्रावर तर औषधेही उपलब्ध नसतात. तीन मंत्री, आमदार, खासदार इचलकरंजीत वारंवार बैठका घेतात, सूचना देतात. सुधारणा मात्र होत नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहर परिसरात जोरदार प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देश व राज्यातील सर्वाधिक ४.२ मृत्युदर इचलकरंजीत आहे. वाढणारी रुग्णसंख्या कमी करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या टेस्टिंग, ट्रेसिंग आणि तत्काळ ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा इचलकरंजीत वापर होताना दिसत नाही. पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक बिनदिक्कतपणे फिरताना आढळतात. अनेक वेळा रस्त्यावरून फिरणाऱ्यांची तपासणी केल्यानंतर त्यांमध्ये किमान पाच-सहा तरी पॉझिटिव्ह आढळतात. अशा गंभीर परिस्थितीतही सरकार व प्रशासन अतिशय ढिसाळ पद्धतीने कारभार करीत आहे.
अनेक रुग्ण आजार अंगावर काढणे, किरकोळ उपचार घेत दिवस वाया घालविणे, खासगी रुग्णालयांत उपचार घेऊन आजार बळावल्यानंतर शासकीय रुग्णालयात दाखल होतात. या प्रमुख कारणांमुळे इचलकरंजीतील मृत्युदर वाढला आहे. याबाबत टास्क फोर्सनेही सूचना दिल्या आहेत. त्यावरही अद्याप अंमलबजावणी दिसत नाही. कारण खासगी रुग्णालये प्रशासनाच्या सूचनांना भीक घालत नाहीत, अशी अवस्था आहे. खासगी रुग्णालयांत बिलांच्या ऑडिटसह शासकीय योजनांच्या लाभांसंदर्भात सावळागोंधळ दिसून येतो. अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून शासकीय योजनांचा लाभ नको, असे लिहून घेतले जाते अथवा एका जबाबदार व्यक्तीस बिलाबाबत मध्यस्थ घातले जाते, असा प्रकारही सुरू आहे. खासगी रुग्णालयांमध्ये प्रतिदिवस दहा हजार रुपये किमान दर व त्यामध्ये औषधे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांनुसार दर अधिक लावला जातो.
एकूणच या गंभीर परिस्थितीत पहिल्या लाटेतील परिस्थिती हाताळलेल्या तुलनेत दुसऱ्या लाटेत प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे.
वाढत्या मृत्युदराबाबतची तपासणी करण्यासाठी आलेल्या टास्क फोर्सकडे काही नातेवाइकांनी आयजीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून रुग्ण व नातेवाइकांना मिळणारी वागणूक गैरप्रकाराची असल्याच्या तक्रारी केल्या. त्याबाबत रुग्णालय प्रशासनाने ताबडतोब सुधारणा करणे आवश्यक आहे.
बाहेरच्या जिल्ह्यातील रुग्णही दाखल
शहरातील उपचार घेणारे रुग्ण सध्या ४७० च्या घरात आहेत. त्यांतील सुमारे १५० जण घरात उपचार घेत आहेत. या तुलनेत तीनही कोविड सेंटर मिळून बेडची संख्या ६१८ इतकी आहे. त्यामुळे बेड शिल्लक आहेत; परंतु परिसरातील ग्रामीण भागातून तसेच आयजीएम रुग्णालयात बाहेरच्या जिल्ह्यांतूनही रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. त्याचबरोबर खासगी हॉस्पिटलमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल आहेत.
प्रतिक्रिया
मंत्रिमहोदयांच्या सूचनेनंतर कोविड केंद्रामध्ये औषधे उपलब्ध झाली आहेत. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही सुरू आहे. परिस्थिती सध्या प्रशासनाच्या नियंत्रणात आहे.
- डॉ. सुनीलदत्त संगेवार, आरोग्याधिकारी