इचलकरंजीतील नाट्यगृहाचा खेळखंडोबा
By Admin | Updated: March 16, 2016 23:43 IST2016-03-16T23:08:58+5:302016-03-16T23:43:51+5:30
संयोजक, रसिकांना त्रास : ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी अवस्था असल्याने आयोजकांतून तीव्र नाराजी

इचलकरंजीतील नाट्यगृहाचा खेळखंडोबा
अतुल आंबी -- इचलकरंजी -येथील श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह हे सध्या ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ असे बनले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाट्यगृहाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे नाट्यरसिकांसह शो आयोजकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील भव्य-दिव्य असे देखणे नाट्यगृह गेल्या अनेक वर्षांपासून सर्वत्र प्रसिद्ध आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी या नाट्यगृहामध्ये आपली कला सादर केली आहे. तसेच प्रत्येक कलाकार व आयोजकांनी नाट्यगृहाच्या देखणेपणाबद्दल दाद दिली आहे. अलीकडच्या काळात प्रशासनाच्या दुर्लक्षाने नाट्यगृहाचा खेळखंडोबा बनला. आतील बॉक्स खुर्च्यांची मोडतोड झाली. मुख्य प्रवेशद्वारासह अन्य बाजूंचे प्रवेशद्वाराचे शटर खराब झाले आहेत. याबाबत अनेक वेळा दैनिकांतून आवाज उठविल्यानंतर जागे झालेल्या नगरपालिकेने नोव्हेंबर २०१४ मध्ये नवीन खुर्च्या बसविण्याची निविदा काढली.
ही निविदा बांधकाम विभागाच्या मक्तेदाराला देणे आवश्यक असताना इलेक्ट्रिकल मक्तेदाराला दिले असल्याची टीका सुरू झाली. अनेक तक्रारी व वाद-विवाद उफाळून आल्याने कित्येक दिवस नाट्यगृहाचे कामकाज प्रलंबित राहिले. दरम्यानच्या काळातील नगरपालिकेचे उत्पन्नही बुडाले. अशा वादग्रस्त पार्श्वभूमीवर एकदाचे नाट्यगृहातील खुर्च्यांचे काम पूर्ण झाले. त्यानंतरही खुर्च्यांचे करण्यात आलेले नूतनीकरण निकृष्ट दर्जाचे असून, पूर्वीच्या आरामदायी बॉक्स खुर्च्या व आताच्या खुर्च्या यामध्ये मोठा फरक असून, टेंडर प्रक्रिया ते काम पूर्ण होईपर्यंतच्या सर्व कामाची रीतसर चौकशी करून मगच मक्तेदाराला बिल अदा करावे, अशा मागणीची तक्रारही येथील अमर नवाळे यांनी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खुर्च्यांचे कामकाज पूर्ण झाल्यानंतरही नाट्यगृहाच्या जनरेटरची निविदा काढणे आणि कोल्हापूर मनोरंजन विभागाचा परवाना काढणे प्रलंबित होते. या प्रक्रियेत ढिसाळ नियोजनामुळे तीन ते चार महिन्यांचा कालावधी वाया गेला. एकूणच प्रशासनाच्या अशा कारभारामुळे वर्षभर नाट्यगृह या ना त्या कारणाने बंदच राहिले.
तशातच नगरपालिकेने एका खासगी डान्स क्लासला नाट्यगृहाच्या आतील लॉबीमध्ये परवानगी दिली आहे. तिकिटाने शो असला तरीही डान्स क्लासला येणारी मुले-मुली यांची लॉबीमध्ये वर्दळ असते. तसेच त्यांना नेण्यासाठी आलेले पालकही मुख्य प्रवेशद्वारातूनच आत-बाहेर करणे. तसेच लॉबीमधून नाट्यगृहात जाऊन शो पाहणे, असे प्रकार होतात. त्यामुळे याचा नाहक त्रास संयोजक व रसिकांना होतो. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या वशिल्याने कदाचित डान्स क्लासला परवानगी देण्यात आली असेल. मात्र, त्याचा त्रास पैसे भरून बुकिंग करणाऱ्या संयोजकाला का, असा संतप्त सवालही संयोजकांतून उपस्थित होत आहे. नगरपालिका प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
भाडे व्यावसायिक पद्धतीने; सुविधा मात्र नाहीत
नाट्यगृहामध्ये एखाद्याने मोठा शो आयोजित केला तर महापालिका त्याच्याकडून अनामत रक्कम व भाडे नियमाप्रमाणे घेतले जाते. मात्र, शो करतेवेळी नाट्यगृहामध्ये व्यावसायिक पद्धतीची सुविधा व वातावरण कार्यक्रमाच्या संयोजकाला मिळत नाही. सायंकाळच्या वेळी परिसरातील अनेक नागरिक फिरण्यासाठी नाट्यगृहाच्या बाहेरील लॉनचा व लॉबीचा सर्रास वापर करीत असतात. तसेच अनेक विद्यार्थीही अभ्यासासाठी तेथील परिसरात बसलेले असतात. त्यामुळे शो पाहण्यासाठी आलेल्या रसिकांना व संयोजकांना त्याचा नाहक त्रास होतो. त्यामुळे या सर्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी कार्यक्रमाच्या संयोजकांतून होत आहे.
प्रवेशद्वार, शटरची डागडुजी आवश्यक
नाट्यगृहाचे मुख्य प्रवेशद्वार व आतील बाजूस असलेले काचेचे दरवाजे, तसेच कलाकारांना थेट मंचकावर येण्यासाठीचे शटर, त्यानंतर पाठीमागील बाजूने बाहेर पडण्यासाठी लावण्यात आलेले शटर हे सर्व खराब झाले आहेत. त्यामुळे उघडझाक करताना अडचणी येतात.