ST Strike : इचलकरंजीत एस.टी.कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू, कर्मचारी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 19:01 IST2022-01-10T18:59:26+5:302022-01-10T19:01:14+5:30
कारणे दाखवा नोटिसीमुळे आलेले दडपण आणि मुंबई येथील बैठकीत एस.टी. कर्मचाऱ्याच्या मागण्यांबाबत तोडगा न निघाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

ST Strike : इचलकरंजीत एस.टी.कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू, कर्मचारी संतप्त
इचलकरंजी : शहापूर (ता.हातकणंगले) येथील एस.टी.आगारासमोर सुरू असलेल्या एस.टी.कर्मचाऱ्याच्या संपातील एका वाहकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. शरणाप्पा गिरमलप्पा मुंजाळे (वय ३१, मूळ गाव अक्कलकोट) असे त्यांचे नाव आहे.
दरम्यान, ५ जानेवारीला लागू केलेल्या कारणे दाखवा नोटिसीमुळे आलेले दडपण आणि मुंबई येथील बैठकीत एस.टी. कर्मचाऱ्याच्या मागण्यांबाबत तोडगा न निघाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
मुंजाळे हे मूळचे अक्कलकोटचे आहेत. साधारण दोन वर्षांपूर्वी त्यांची सिंधुदुर्ग येथून इचलकरंजीत बदली झाली होती. एस.टी.कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सुरू असलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. सोमवारी उपोषणस्थळी सर्व कर्मचारी मुंबई येथील मंत्र्याची बैठक बघत होते. त्यावेळी मुंजाळे याला हृदयविकाराचा धक्का बसला.
कर्मचाऱ्यांनी तत्काळ हालचाली करत त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी प्रशासन आणखीन कितीजणांचा बळी घेणार, असे म्हणत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
कर्मचाऱ्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गर्दी करत या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. मुंजाळे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे काम आयजीएम रुग्णालयात सुरू होते. रुग्णालयासमोर महिला कर्मचारी व नातेवाइकांनी आक्रोश केला.