इचलकरंजीत प्रोसेस कामगाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 16:50 IST2024-02-11T16:49:25+5:302024-02-11T16:50:16+5:30
येथील शांतीनगरमधील एका स्मशानभूमीमध्ये एका प्रोसेस कामगाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला.

इचलकरंजीत प्रोसेस कामगाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून
इचलकरंजी : येथील शांतीनगरमधील एका स्मशानभूमीमध्ये एका प्रोसेस कामगाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. प्रशांत भैरू कुराडे (वय 25, रा.इंदिरानगर गल्ली नं. 3) असे त्याचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, मृतदेह दगडाने ठेचून पुन्हा मृतदेहावर मोठमोठे दगड, सिमेंटचे तुकडे ठेवण्यात आले होते.
शांतीनगर येथे कोल्हाटी डोंबारी समाजाची स्मशानभूमी आहे. तेथे एका युवकाचा मृतदेह पडल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह पथकाने धाव घेतली. दगड तसेच सिमेंट काँक्रीटच्या तुकड्यांनी डोके ठेचूने निर्घृण खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. मृतदेह लपवण्यासाठी मृतदेहावर मोठा दगड, सिमेंटचे तुकडे, खांब यांचा थरच टाकण्यात आला होता. पोलिसांनी अंदाजावरून शोध घेतला असता प्रशांत कुराडे याच्या बहिणीने मृतदेह ओळखला. घटनास्थळी उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी भेट देवून पाहणी केली. पोलिसांना घटनास्थळी नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळले असून ते जप्त करण्यात आले आले. इंदिरा गांधी इस्पिळात उत्तरीय तपासणी करण्यात आली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी गावभाग पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.