जागतिक बाजारात ‘इचलकरंजी ब्रँड’ कापड

By Admin | Updated: December 22, 2014 00:15 IST2014-12-22T00:11:17+5:302014-12-22T00:15:18+5:30

उत्पादकांना संधी : ‘टाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्स’चा होणार परिणाम

'Ichalkaranj brand' cloth in the global market | जागतिक बाजारात ‘इचलकरंजी ब्रँड’ कापड

जागतिक बाजारात ‘इचलकरंजी ब्रँड’ कापड

इचलकरंजी : केंद्र सरकारच्या उद्योग व व्यापार मंत्रालयाने इचलकरंजी वस्त्रनगरीची ‘टाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्स’ म्हणून निवड केल्याने शहराचा ठसा आता जागतिक बाजारात उमटला आहे. सूत, कापड, तयार कपडे निर्यात करण्यासाठी सरकार आता विशेष लक्ष पुरविणार असल्याने येथील कापड उत्पादकांना निर्यातीच्या बाजारपेठेत स्वत:चा ब्रॅँड निर्माण करण्याची संधी आली आहे. शंभर वर्षांपूर्वी कंपोझिट मिलचा जमाना असताना सन १९०४ मध्ये विकेंद्रित क्षेत्रातील पहिला यंत्रमाग (पॉवरलूम) इचलकरंजीत स्थापित झाला. तेव्हा येथील कापड उद्योगाने अनेक अडथळे पार करीत यशस्वीपणे आपले स्थान टिकवले. स्वातंत्र्योत्तर काळात इचलकरंजी साडीचा दबदबा सर्वदूर होता. सातव्या दशकात सरकारने यंत्रमागावर साडी विणण्यास बंदी आणली. अचानकपणे झालेल्या आघाताने इचलकरंजीचा यंत्रमाग उद्योग कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली; पण येथील यंत्रमागधारकांनी पांढऱ्या सुती कपड्याचे अनेक प्रकारचे कापड उत्पादन करीत प्रगती साधली. विसाव्या शतकाच्या अखेरीस जागतिकीकरणाचे वारे जोराने वाहू लागले. यंत्रमाग उद्योग मंदीच्या भोवऱ्यात अडकला; पण त्यावरही मात करीत येथील यंत्रमागधारक-कापड उत्पादकांनी आधुनिकीकरणाची कास धरीत नवनवीन कापड निर्मितीचे प्रयोग केले आणि शेकडो प्रकारच्या कापडाचे उत्पादन होऊ लागले. याच काळात केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी तांत्रिक उन्नयन निधी (टफस्) योजना जाहीर केली. आधुनिक यंत्रसामग्रीसाठी आयात शुल्कावर आणि किमतीवर अनुदान घोषित केले. त्यावेळी प्रकाश आवाडे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री होते. त्यांनीही यंत्रमाग उद्योगाला २३ कलमी पॅकेजबरोबर नवउद्योजकांना प्रोत्साहनात्मक खेळत्या भांडवलात व्याजदराची सवलत, उद्योगांचा डी प्लस झोन अशा शासकीय सवलती व अनुदान दिले. त्याचा फायदा येथील वस्त्रोद्योगाला झाला. यंत्रमाग उद्योगात आधुनिक तंत्रज्ञान आले. तसेच आधुनिक रॅपिअर व शटललेस लूम्सची संख्या वेगाने वाढली. महाराष्ट्रात मिळालेल्या टफस्च्या अनुदानापैकी ८० टक्के अनुदान एकट्या इचलकरंजी शहरातील यंत्रमाग उद्योजकांना मिळाले. इचलकरंजी परिसरात आता सव्वा लाख यंत्रमाग व पंचवीस हजार रॅपिअर शटललेस लूम्स आहेत. या मागांवर सुमारे साडेतीन हजार प्रकारचे कापड तयार होते. त्यामध्ये सुटिंग-शर्टिंग, ड्रेस मटेरियल, प्रिंटेड साडी, केम्ब्रिक, मलमल, लुंगी, धोती, उपरणे अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. विविधतेबरोबर कापडाचे मूल्यावर्धन होते. त्यामुळे आता इचलकरंजी परिसरातील मागांवर अनेक ब्रॅण्डेड कंपन्या व बडे व्यापारी जॉब वर्क पद्धतीने कापड तयार करून घेतात आणि हेच कापड स्वत:च्या ब्रॅण्डवर अनेक पटीने वाढीव किंमत घेत निर्माण करतात, तर काही यंत्रमागधारकांनी नेमकी हीच बाब लक्षात घेत स्वत: कापड निर्यातीला सुरुवात केली. त्याची दखल घेत केंद्र सरकारच्या व्यापार व उद्योग मंत्रालयाने गेल्या तीन वर्षांचे सर्वेक्षण करून इचलकरंजीतून ७५० कोटींहून अधिक कापड निर्यात झाल्याचे लक्षात आल्यामुळे केंद्र सरकारने टाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्स म्हणून इचलकरंजीची निवड केली. (प्रतिनिधी)

Web Title: 'Ichalkaranj brand' cloth in the global market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.