"शक्तिपीठ महामार्गासाठी मी कोल्हापूरकर जनतेसाेबतच", खासदार धैर्यशील माने यांनी केलं स्पष्ट

By नितीन काळेल | Updated: February 24, 2025 20:14 IST2025-02-24T20:13:48+5:302025-02-24T20:14:35+5:30

Dhairyasheel Mane: प्रत्येकाला पक्ष वाढवायचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वतंत्र की एकत्र लढायची याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई घेतील, अशी माहिती शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

"I am with the people of Kolhapur for the Shakti Peeth Highway", MP Dhairyasheel Mane clarified | "शक्तिपीठ महामार्गासाठी मी कोल्हापूरकर जनतेसाेबतच", खासदार धैर्यशील माने यांनी केलं स्पष्ट

"शक्तिपीठ महामार्गासाठी मी कोल्हापूरकर जनतेसाेबतच", खासदार धैर्यशील माने यांनी केलं स्पष्ट

- नितीन काळेल  
सातारा -  प्रत्येकाला पक्ष वाढवायचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वतंत्र की एकत्र लढायची याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई घेतील, अशी माहिती शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली. तसेच खासदार संजय राऊत दिल्लीत काय दिवे लावतात माहीत आहे, असा टोला लगावतानाच शक्तीपीठ महामार्ग प्रश्नासाठी मी कोल्हापूरकर जनतेसाेबतच राहणार, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार माने बोलत होते. यावेळी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, सातारा शहरप्रमुख नीलेश मोरे, महिला जिल्हाप्रमुख शारदा जाधव यांच्यासह शिंदेसेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी खासदार माने यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, शिंदेसेनेची सभासद नोंदणी अभियान सुरू झाले आहे. माझ्याकडे सातारा जिल्ह्याचीही जबाबदारी आहे. शिंदे सेना ही जिल्ह्यातील गावांत, घराघरांत आणि सामान्य माणसांपर्यंत पोहोचायला हवी यासाठीच हे अभियान आहे. यातून पक्षाला बळकटी देण्यात येईल. सातारा जिल्ह्यात पक्षाचं केडर खूप चांगलं आहे. आता पक्षबांधणीचा कार्यक्रम सुरू आहे.

दरम्यान, पत्रकार परिषदेतच सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर खासदार माने यांनी प्रत्येक पक्षाला आपले मत जाहीर करण्याचा अधिकारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक शिंदेसेनेत कशी लढवायची ? याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई घेतील. तरीही शिवसेना वादळात दिवा लावणारा पक्ष आहे. त्यामुळे निवडणुकीतील विजयात शिंदेसेनाच पुढे असेल, असे ठामपणे सांगितले. तर मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली. याचा फायदा भाजपकडून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे ?, शिंदेसेना आणि भाजपात वितुष्ट आले आहे का ? असा प्रश्नही पत्रकारांनी केला. यावर खासदार माने यांनी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे प्रमुख चेहरा होते. सर्वच योजना शिंदे यांच्या काळातच आल्या. राज्यात त्रिवेणी संगम आहे. त्यामुळे आमचं सरकार अभेद्य आहे. सांघिक प्रयत्नाने निवडणुकीत यश मिळाले. शिंदेसेना आणि भाजपमध्ये कोणतेही वितुष्ट आलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत राहिलेला पक्षही संपवणार 
उध्दवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नावर खासदार माने यांनी राऊत हे आकाशातून उतरलेले विमान आहे. त्यांना दररोज साक्षात्कार होतो. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल ते बोलले. मोठ्या पदावरील व्यक्तींबाबत चुकीचे बाेलू नये. ते दिल्लीत काय दिवे लावतात माहीत आहे. आता ते राहिलेली उध्दवसेनाही संपवायाला निघालेत, असा टोला लगावला.

शक्तीपीठाबाबत समन्वयाने मार्ग काढावा
राज्यातील शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून तर याला अधिकच विरोध आहे, यावर कोल्हापूरकर म्हणून आपली भूमिका काय ? असा प्रश्न पत्रकारांनी केला. या प्रश्नाला खासदार माने यांनी या शक्तीपीठ महामार्गात अल्पभूधारक शेतकरी अधिक येतात. या महामार्गाबद्दल दोन मतप्रवाह आहेत. राज्य शासनाने याबाबत समन्वयातून मार्ग काढावा. तसेच कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना हा मार्ग नको असेल तर मी त्यांच्याबरोबरच राहणार, असे उत्तर दिले.

Web Title: "I am with the people of Kolhapur for the Shakti Peeth Highway", MP Dhairyasheel Mane clarified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.