कोल्हापूर : दारूचे व्यसन सोडल्यानंतरची अस्वस्थता आणि नैराश्यातून पत्नी, मुलीचा खून करून मुलास गंभीर जखमी केल्याप्रकरणी अजित सीताराम शिंदे (वय ४३, रा. जुने पारगाव, ता. हातकणंगले) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांनी मंगळवारी (दि. ६) झालेल्या सुनावणीत दोषी ठरवले. हा गुन्हा ६ नोव्हेंबर २०१७ मध्ये जुने पारगाव येथे घडला होता. शिक्षेबद्दल दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून शुक्रवारी (दि. ९) निर्णय होईल, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी दिली.जुने पारगाव येथील अजित शिंदे याला दारूचे व्यसन होते. काही दिवस दारू सोडल्यानंतर त्याची अस्वस्थता वाढली होती. याच नैराश्यातून तो पत्नीशी वारंवार वाद घालत होता. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी नाश्ता द्यायला उशीर झाल्याच्या कारणातून त्याने पत्नी, मुलगी आणि मुलाला बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या पत्नी दीपाली (वय २५) आणि मुलगी वैभवी (वय १०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर मुलगा प्रेम उर्फ आदित्य (वय ६) बचावला. दीपाली यांचे भाऊ मधुसुदन रवींद्र कांबळे यांच्या फिर्यादीनुसार पेठ वडगाव पोलिसांनी हल्लेखोर अजित शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तत्कालीन पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. जिल्हा सरकारी वकील विवेक शुल्क यांनी न्यायालयात १६ साक्षीदार तपासले. यात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार गाढवे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सर्व साक्षी, पुरावे आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी शिंदे याला दोषी ठरवले. त्याला काय शिक्षा होणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.क्षुल्लक कारणातून खून, कुटुंब उद्धवस्तपत्नीने वेळेत नाश्ता दिला नाही. मुलगी सारखी खेळायला बाहेर जाते आणि मुलगा सारखा किरकिर करतो, अशा क्षुल्लक कारणातून शिंदे याने तिघांवर जीवघेणा हल्ला केला होता. त्या घटनेत आई आणि बहिणीचा मृत्यू झाला, तर वडील तुरुंगात गेल्याने सहा वर्षीय प्रेम उर्फ आदित्य पोरका झाला.
Kolhapur: पत्नी, मुलीच्या खूनप्रकरणी पती अजित शिंदे दोषी; क्षुल्लक कारण अन् कुटुंब उद्धवस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:43 IST