वायुदलाच्या हेलिकॉप्टरची मदतकार्यात मोठी कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:57 IST2019-08-14T00:48:58+5:302019-08-14T00:57:26+5:30
गेल्या पाच दिवसांमध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांसाठी आवश्यक अशा ४0 टन वस्तूंचे वितरण या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून करण्यात आले.

हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सेवा देणारे हे वायुदलाचे पथक. दुसºया छायाचित्रात कुरुंदवाड येथे कर्मचाºयांनी जीवनावश्यक साहित्य उतरून घेतले.
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील अनेक गावांवर महापुराचे संकट कोसळले असताना वायुदलाचे एमआय १७ व्ही ५ हे हेलिकॉप्टर या सर्वांसाठी देवदूत ठरले आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांसाठी आवश्यक अशा ४0 टन वस्तूंचे वितरण या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून करण्यात आले.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, म्हाडाचे कार्यकारी संचालक अशोक पाटील, उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून समन्वय ठेवला; तर प्रांताधिकारी सचिन इथापे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, कृषी अधिकारी अतुल जाधव, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संग्राम धुमाळ, पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले, गौण खनिज अधिकारी अमोल थोरात यांच्यासह पोलीस आणि अन्य कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर विमानतळावरील यंत्रणा सांभाळली.
रोज सकाळी जीवनावश्यक वस्तू आल्यानंतर त्या भरून कुरुंदवाड येथे उतरल्या जात. शिरोळ येथील दत्त कारखान्यावर आलेले साहित्यही कुरुंदवाड येथे आणून दिले जाई. काही गावांमध्ये टेरेसवरही वस्तू देण्यात आल्या. ग्रुप कॅप्टन श्रीधर, पायलट कृष्णन, सहपायलट नवाज, स्क्वाड्रन लीडर संदीप पोवार, फ्लाईट गनर जे. डब्ल्यू गुप्ता, फ्लाईट इंजिनिअर साजन गोगोई यांची टीम या हेलिकॉप्टरसाठी कार्यरत आहे.
कोल्हापूरच्या सुपुत्राचाही सहभाग
या हेलिकॉप्टवर कार्यरत असणारे स्क्वॉड्रन लीडर संदीप पोवार हे मूळचे सरवडे (ता. राधानगरी) येथील. सातारा येथील सैनिक स्कूल आणि कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. २००९ साली ते वायुदलात दाखल झाले.
आसाम, राजस्थान येथे सेवा बजावल्यानंतर गेली तीन वर्षे ते मुंबईत कार्यरत आहेत. ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने त्यांनी आपल्या या जिल्ह्यात आलेल्या आपत्तीवेळी सर्व अधिकाऱ्यांशी चांगला समन्वय ठेवत नेटकी कामगिरी बजावली आहे.
रॉकीचाही सहभाग
बॉम्बशोधक व नाशक पथकातील रॉकी या श्वानानेदेखील आपली सेवा विमानतळावर बजावण्याचे चोख काम सुरू ठेवले आहे. हेलिकॉप्टरमध्ये कोणतेही साहित्य पोहोचविण्यापूर्वी तसेच ठेवल्यानंतरही त्याच्याकडून तपासले जाते.