हडलगेच्या १०२ वर्षाच्या वृद्धेची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 18:44 IST2020-08-07T18:40:55+5:302020-08-07T18:44:01+5:30
हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील शंभरी पार केलेल्या वृध्द महिलेनं जिद्दीच्या जोरावर कोरोनावर मात केली. ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

हडलगेच्या १०२ वर्षाच्या वृद्धेची कोरोनावर मात
गडहिंग्लज :हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे कोरोनाबाधित मुलाच्या संपर्कात आल्याने १०२ वर्षाच्या वृद्धेला कोरोनाची बाधा झाली. वयोवृद्ध आणि संबंधित घरात अपंग नात असल्याने त्यांचे गृह विलगीकरण करून उपचार करण्यात आले. वयाची शंभरी पार करून जिद्दीच्या जोरावर कोरोनावर मात करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.
एकीकडे धडधाकट व्यक्ती कोरोना झाल्याच्या भितीपोटी बळी पडत आहेत. मात्र, कोरोनाच्या लढाईत जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगलेल्या वयोवृद्धेने कोणत्याही रूग्णालयात न जाता गृह विलगीकरणात उपचार घेवून कोरोनाला हरविले आहे.
कांही दिवसापूर्वी वृद्धेचा मुलगा व सून कोरोनाबाधित झाले. त्यांच्यावर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असतानाच वृद्धाही बाधित झाल्याचे निष्पन्न झाले.
वयोवृद्ध, रक्तदाब, मधुमेह व अन्य दुर्गर आजार असणाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांची विशेष दक्षता घेतली जाते.
अशा व्यक्तींना सीपीआर व अन्य खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येते. मात्र, घरी अपंग नात असल्याने वयोवृद्ध असूनही न डगमगता घरीच उपचार करण्याची मागणी वृद्धेने केली.
वैद्यकिय अधिक्षक डॉ. दिलीप आंबोळे व तालुका आरोग्य अधिकारी एम. व्ही. अथर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंगूरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विजय खारोडे, डी. बी. तनगुडे, ए. वाय. नाईक, आशासेविका एस. जी. हुबळे व व्ही. बी. कांबळे यांनी वृद्धेवर उपचार केले.
प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर यांनीही वेळोवेळी भेट देवून तब्येतिची विचारपूस केली.