रंकाळा टॉवर येथे घर पेटविले
By Admin | Updated: November 30, 2014 00:59 IST2014-11-30T00:37:53+5:302014-11-30T00:59:49+5:30
मोरस्कर गटाकडून हल्ला : घरासह रिक्षा, मोपेड, आगीच्या भक्ष्यस्थानी

रंकाळा टॉवर येथे घर पेटविले
कोल्हापूर : रंकाळा टॉवर परिसरातील कांदेकर आणि मोरस्कर गटातील असलेल्या वर्चस्ववादाचा भडका पुन्हा एकदा उडाला. मोरस्कर गटाने कांदेकर गटाच्याकिशोर भोसले (महाराज) यांचे घर रॉकेलचे बोळे टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भोसले कुटुंबीय आरडाओरडा करीत पाठीमागील दरवाजाने बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जमावाने घरासमोर लावलेली रिक्षा व मोपेडदेखील पेटवली. ही घटना काल, शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव असून, पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. हल्ल्यातील संशयित रणजित मोरस्करसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर रोहिणी मोरस्कर व राहुल मोरस्कर हे अद्याप फरार आहेत.
याबाबत माहिती अशी, भोसले आणि मोरस्कर एकाच गल्लीत राहतात. त्यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून वर्चस्व व भेलगाडीच्या व्यवसायातून वाद आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कांदेकर व मोरस्कर गटांत धुमश्चक्री उडाली होती. याप्रकरणी दोन्ही गटांवरही लक्ष्मीपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद आहेत. लता किशोर भोसले यांचा मुलगा राहुल याचा जामीन मंजूर न झाल्याने तो बिंदू चौक कारागृहात आहे. या वादातूनच भोसले यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला झाला. दरम्यान, हल्ल्याची माहिती समजताच पोलीस व जवानांंनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यानंतर संशयित आरोपींवर खुनाचा प्रयत्न, जाळपोळ या कलमांखाली गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे करीत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री भोसले यांचे घर, रिक्षा व मोपेड गाडी पेटवून संशयित पळून गेल्यानंतर परिसरातील नागरिक या घटनेमुळे भयभीत झाले आहेत. सकाळी या परिसरातील अनेक बंगल्यांचे दरवाजे बंद ठेवून लोक आतमध्ये बसून होते. बाहेर पोलीस बंदोबस्त असल्याने घरातून बाहेर पडण्याचे धाडस कोणी करीत नव्हते. माध्यमाचे प्रतिनिधी व छायाचित्रकार घटनास्थळी गेल्यावर काही नागरिक जमा झाले. यावेळी स्वत:चे घर पेटल्याचे पाहून लता भोसले यांना अश्रू अनावर झाले. भोसले कुटुंबीय स्तब्ध होवून आगीमध्ये कोळसा झालेले आपले प्रापंचिक साहित्य, रिक्षा व मोपेडकडे पाहात होते. त्यांच्या घराच्या हाकेच्या अंतरावरच संशयित आरोपीचा बंगला आहे. त्याच्या दरवाजाला कुलूप होते. (प्रतिनिधी)