उद्धव गोडसेकोल्हापूर : पाचवीला पूजलेल्या दारिद्र्यातही सन्मानाने जगण्याची आस होती. त्यामुळेच राजारामपुरीतील शाहूनगर परिसरात छोट्याशा घरात राहणारे रशीद मक्तूम सय्यद आणि त्यांची पत्नी रेश्मा हे दाम्पत्य धडपडत होते. कसबा बावडा येथील कचरा प्रकल्पावर ठेकेदाराकडे नोकरी करून ते मुलाच्या शिक्षणासाठी पै-पै जमा करीत होते; पण शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत डोळ्यांसमोर त्यांचे घर जळाले अन् त्यांनी साठवलेल्या अडीच लाखांच्या रोकडसह स्वप्नांचीही राख झाली. मंगळवारी (दि. ६) सकाळी झालेल्या घटनेने सय्यद दाम्पत्याला मानसिक धक्का बसला.रशीद सय्यद यांचे शाहूनगरमध्ये वडिलोपार्जित छोटेसे घर आहे. या घरात ते पत्नी रेश्मा, मुलगा रमजान आणि मेहुणीसोबत राहतात. सय्यद दाम्पत्य कसबा बावड्यातील कचरा प्रकल्पावर रोजंदारीने काम करतात. दोघांना दरमहा प्रत्येकी नऊ हजार रुपये मिळतात. याशिवाय कचऱ्यात सापडणारे प्लास्टिक आणि भंगार विकून ते चार पैसे मिळवतात. यातील किमान दहा हजार रुपये ते दर महिन्याला साठवत होते. सुमारे अडीच लाखांची रोकड घरात एका पिशवीत ठेवली होती.
वाचा : शॉर्टसर्किटची आग, सिलिंडर स्फोटाने भडकली; अडीच लाख रुपये जळालेघराला आग लागल्याची माहिती मिळताच १५ मिनिटांत ते बावड्यातून शाहूनगरात पोहोचले. गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भडकलेल्या आगीमुळे ते घराजवळही पोहोचू शकले नाहीत. डोळ्यांसमोर जळणारे घर पाहून त्यांच्या काळजात चर्र झाले. आयुष्यभर कष्ट करून घेतलेल्या वस्तू, दागिने आणि रोकड हाताला लागेल की नाही, याची चिंता त्यांना सतावत होती.अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविताच ते घरात गेले. स्फोटाने उद्ध्वस्त झालेल्या घरात जाताच त्यांचे उरलेसुरले अवसान गळून पडले. त्यांच्या पत्नीने पैशांची पिशवी काढून पाहिली असता त्यातून अर्धवट जळालेल्या नोटांचे पुडके बाहेर आले. लोखंडी कपाटातील दोन गंठण आणि एक अंगठी जवळपास वितळली होती. जळालेल्या नोटा आणि संसारोपयोगी साहित्याची झालेली राख पाहून सय्यद दाम्पत्याने हंबरडा फोडला. कष्टाने पै-पै साठवून उभ्या केलेल्या संसाराची डोळ्यांसमोर राख झाल्याचे पाहून ते कोसळले. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला.दीड लाख रुपये वाचलेआई वारल्यानंतर आठवण म्हणून तिची एक साडी रशीद यांनी पत्र्याच्या पेटीत ठेवली होती. त्या साडीच्या घडीत दीड लाखांची रोकड ठेवली होती. लोखंडी कपाटात ठेवलेली पत्र्याची पेटी आगीतून बचावल्याने आईची आठवण आणि दीड लाखांची रोकड वाचली. आईनेच ही रक्कम वाचवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.उमेदवारांची गर्दीशाहूनगरात आग लागल्याचे समजताच या प्रभागातील उमेदवारांनी प्रचार थांबवून घटनास्थळी धाव घेतली. अखेरपर्यंत थांबून ते रशीद सय्यद यांना धीर देत होते. त्यांच्यासोबत फोटोग्राफर, कॅमेरामनच्या टीम सज्ज होत्या. संकटकाळी ते धावून आल्याने नागरिकांनी आभार मानले; पण सय्यद दाम्पत्यास मदत व्हावी, अशी भावनाही व्यक्त केली.
Web Summary : A fire in Shahunagar, Kolhapur, devastated the Syed family, destroying their home and ₹2.5 lakh savings. The couple, working at a waste plant, lost everything, including their aspirations for their child's education, in the tragic incident. Some cash was saved.
Web Summary : कोल्हापुर के शाहूनगर में आग लगने से सैयद परिवार तबाह हो गया, उनका घर और ₹2.5 लाख की बचत जल गई। कचरा संयंत्र में काम करने वाले दंपति ने अपने बच्चे की शिक्षा की उम्मीद सहित सब कुछ खो दिया। कुछ पैसे बच गए।