कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णालयांत आता आरोग्य विशेषज्ञ, रुग्णांची सोय होणार 

By समीर देशपांडे | Updated: April 5, 2025 16:19 IST2025-04-05T16:19:28+5:302025-04-05T16:19:48+5:30

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनंतर नव्याने नियोजन

Hospitals in Kolhapur district will now have health specialists and facilities for patients | कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णालयांत आता आरोग्य विशेषज्ञ, रुग्णांची सोय होणार 

कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णालयांत आता आरोग्य विशेषज्ञ, रुग्णांची सोय होणार 

समीर देशपांडे

कोल्हापूर : जिल्ह्यातील २३ सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करून घेऊन प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विशेषज्ञ पुरविण्याचे नव्याने नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी हे नियोजन केले असून, या विशेषज्ञांना दिवस ठरवून देण्यात आले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागात सध्या मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यासाठी प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ असला तरी किमान प्रायोगिक तत्वावर कोल्हापूर जिल्ह्यात स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काही प्रमुख रुग्णालयांमध्ये या तज्ज्ञांची संख्या पुरेशी आहे. त्यातीलच प्रत्येक विशेषज्ञांना जिल्ह्यातील एक ग्रामीण रुग्णालय निश्चित करण्यात आले आहे. काही ठिकाणी जवळच्या ग्रामीण रुग्णालयातील विशेषज्ञांनाही दिवस ठरवून देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आठवड्यातून एक दिवस हे विशेषज्ञ प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध राहणार असल्याने रुग्णांची सोय होणार आहे.

काही ठिकाणी भूलतज्ज्ञ वेळेत उपलब्ध होत नसल्याने शस्त्रक्रियेसाठीही अडचण निर्माण होते. अशा ठिकाणी भूलतज्ज्ञ आणि शस्त्रक्रिया करणारे डाॅक्टर यांनी वेळापत्रकानुसार शस्त्रक्रियेचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत दिलीप माने यांनी विशेषज्ञनिहाय आणि ग्रामीण रुग्णालय आणि आठवड्यातील वारानुसार नियोजन करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांना पाठविले असून, त्यानुसार नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत.

भविष्यात राज्यभर नियोजन

अनेक जिल्ह्यांत मोठ्या शासकीय रुग्णालयात पुरेशा संख्येने स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, शल्यविशारद आहेत. परंतु ग्रामीण भागात मात्र अनेक जागा रिक्त असल्याने संबंधितांची सेवा मिळू शकत नाही. यासाठीचा हा मध्यम मार्ग काढण्यात आला असून, कोल्हापूर जिल्ह्यात जर या नियोजनाची फलदायी अंमलबजावणी झाली, तर नवीन भरती होईपर्यंत अन्य जिल्ह्यातही हा प्रयत्न करण्यात येणार आहे.

अनेक ग्रामीण रुग्णालयांत विशेषज्ञांच्या जागा रिक्त आहेत. त्या भरण्यासाठीची प्रक्रिया सुरूच आहे. परंतु तोपर्यंत ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना विशेषज्ञांची सेवा मिळत राहावी, यासाठी प्रत्येक रुग्णालयात आठवड्याला किमान एक दिवस विशेषज्ञांनी सेवा दिली पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत. -प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य मंत्री

Web Title: Hospitals in Kolhapur district will now have health specialists and facilities for patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.