महिला दिनी स्त्रीशक्तीचा सन्मान
By Admin | Updated: March 9, 2017 00:16 IST2017-03-09T00:16:00+5:302017-03-09T00:16:00+5:30
अपूर्व उत्साह : महोत्सव, रॅली, मेळावा, पुरस्कार सोहळ््यांचे आयोजन

महिला दिनी स्त्रीशक्तीचा सन्मान
कोल्हापूर : शक्ती, सामर्थ्य, प्रीती, भक्ती, संस्कार आणि प्रसंगी रणरागिणीचे रूप धारण करणाऱ्या स्त्री शक्तीच्या कर्तृत्वाला सलाम करीत बुधवारी कोल्हापुरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महोत्सव, रॅली, मेळावा, पुरस्कार सोहळा, सत्कार, स्पर्धा अशा विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी शहरातील विविध संस्था व महिला संघटनांच्यावतीने स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला. यावेळी महिलांचा अपूर्व उत्साह होता.
कोल्हापूर महापालिका व बालकल्याण समितीच्यावतीने ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्क येथे महिलांसाठी रांगोळी, संगीतखुर्ची, चारोळी, उखाणे, स्पॉट गेम, गीतगायन, डान्स, फॅन्सी ड्रेस अशा स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी महापौर हसिना फरास, आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर उपस्थित होते.
सत्यजित कदम फौंडेशनच्यावतीने आयोजित ताराराणी महोत्सवांतर्गत महिलांसाठी चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. संध्याकाळी हिंदुराव घाटगे कॉलनी मैदान येथे खाद्यमहोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यानंतर ओंकार शेटे दिग्दर्शित ‘जागर कलाविष्कारांचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
आर. के. नगर येथे वनिता सांस्कृतिक संस्थेच्यावतीने प्रसिद्धीपासून दूर राहून समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या पाच महिलांचा कौतुक सोहळा माननीय शोभा तावडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी ‘सृजन आनंद’च्या गायत्री एकांडे, दिव्यांग शिक्षिका शारदा पाटील, कृषी क्षेत्रातील सुशीला धनवडे, एड्सग्रस्त महिलांसाठी काम करणाऱ्या सुषमा बटकडली आणि गीता हासूरकर यांना गौरविण्यात आले. याशिवाय शहरातील संस्था संघटनांच्यावतीने सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील फौंडेशन आणि प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरतर्फे आयोजित गृहिणी महोत्सवाची सुरुवात बुधवारी दसरा चौक येथून महिलांच्या प्रबोधनात्मक रॅलीने झाली.