‘खासबाग’मध्ये साहित्यिकाचा सन्मान
By Admin | Updated: February 7, 2015 00:06 IST2015-02-07T00:01:21+5:302015-02-07T00:06:08+5:30
भालचंद्र नेमाडेंच्या पुरस्काराने ‘ययाती’च्या आठवणी झाल्या ताज्या

‘खासबाग’मध्ये साहित्यिकाचा सन्मान
कोल्हापूर : ‘जीवनासाठी कला’ या प्रेरणातत्त्वाचा पुरस्कार करणारे व मराठी साहित्याला पहिल्यांदाच ‘ज्ञानपीठ’ हा सर्वश्रेष्ठ पुरस्काराचा बहुमान ‘ययाती’च्या निमित्ताने कोल्हापूरच्या वाट्याला आला. त्यावेळी कोल्हापुरातील खासबाग या कुस्तीच्या आखाड्यात लेखक वि. स. खांडेकर यांचा जंगी सत्कार करण्यात आला होता. या समारंभात तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी, ‘भविष्याचा वेध घेणारी प्रतिभा लाभलेले थोर मानवतावादी कलावंत’ अशा शब्दांत त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. या निमित्ताने वि. स. खांडेकरांच्या ‘ययाती’ला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या आठवणी ताज्या झाल्या. वि. स. खांडेकरांची तपोभूमी म्हणजे कलानगरी कोल्हापूर. ‘कांचनमृग’, ‘हृदयाची हाक’, ‘दोन ध्रुव’, ‘उल्का’, ‘क्रौंचवध’, ‘जळालेला मोहर’, ‘अश्रू’, ‘हिरवा चाफा’, ‘पांढरे ढग’, ‘ययाती’, ‘अमृतवेल’, या त्यांच्या कादंबऱ्या. ‘समाधीवरील फुले’, ‘फुले आणि काटे’, ‘घरट्याबाहेर’, ‘मंजिऱ्या’, ‘मृगजळातील कळ्या’, ‘ ही पुस्तके, समीक्षा पुस्तके, ‘तारका’ हा काव्यसंग्रह, ‘एका पानाची कहाणी’ हे आत्मचरित्र, असे साहित्य लेखन त्यांनी केले. सोलापूरमध्ये १९४१ मध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पूर्वी ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ हा एका ठराविक आकृतिबंध साहित्याला दिला जात असे. आता तो साहित्यक्षेत्रातील एकूण कारकिर्दीला दिला जातो. वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ या कादंबरीला १९७४ सालचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ १९७६ मध्ये प्रदान करण्यात आला. खांडेकरांना मिळालेल्या या पुरस्काराचे प्रचंड अप्रूप येथील नागरिकांना होते. म्हणूनच खासबाग मैदानात त्यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह अख्खे मंत्रिमंडळ उपस्थित होते. कुस्तीच्या मैदानात साहित्यिकाच्या गौरवाला जमलेली अलोट गर्दी म्हणजे साहित्याला दिलेला मानाचा मुजराच होता. यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी केलेले भाषण त्यांच्या सर्वोत्तम भाषणांपैकी एक होते. त्यांना उत्तरादाखल वि. स. खांडेकर म्हणाले होते की, तुमच्यासारखा समीक्षक मला भेटला असता, तर आज माझे साहित्य आणखी वेगळे झाले असते.