घरफाळा घोटाळा : आणखी तिघे कारवाईच्या कचाट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 14:37 IST2021-03-19T14:35:57+5:302021-03-19T14:37:25+5:30
Muncipal Corporation Kolhapur- कोल्हापूर महानगरपालिकेत गाजत असलेल्या घरफाळा घोटाळाप्रकरणी चौकशीची तिसरी फेरी पूर्ण झाली असून, त्याचा अहवाल प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालातील नोंदीनुसार एका अधिकाऱ्यासह आणखी तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

घरफाळा घोटाळा : आणखी तिघे कारवाईच्या कचाट्यात
कोल्हापूर : महानगरपालिकेत गाजत असलेल्या घरफाळा घोटाळाप्रकरणी चौकशीची तिसरी फेरी पूर्ण झाली असून, त्याचा अहवाल प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालातील नोंदीनुसार एका अधिकाऱ्यासह आणखी तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि कामकाजाची किचकट पद्धत याचा गैरफायदा घेत स्वत:च्या अधिकारात अनेकांचा फरफाळा कमी करून महापालिकेचे नुकसान करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दिवस आता भरले आहेत. यापूर्वी करनिर्धारक दिवाकर कारंडे, अधीक्षक नितीन नंदवाळकर, अनिरुद्ध शेटे, लिपिक विजय खातू अशा चौघांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
या चौघांनी मिळून चौदा प्रकरणात तीन कोटी १८ लाखांचे नुकसान केल्याचे चौकशी समितीने नमूद केले होते; परंतु ही चौकशी पक्षपाती झाली असून, सात प्रकरणात १ कोटी ४७ लाखाचे नुकसान झाले आहे, तसेच या प्रकरणात तत्कालिन कर निर्धारक व ज्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यास फिर्याद दिली ते संजय भोसलेसुद्धा जबाबदार असल्याने त्यांच्यावरदेखील फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना निलंबित करावे, अशी मागणी माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केली होती.
प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी यासंबंधीची चौकशी करण्याकरिता अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे व सहायक आयुक्त विनायक औंधकर यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने चौकशी करून आपला अहवाल प्रशासक बलकवडे यांच्याकडे शुक्रवारी सादर केला.
ही चौकशी सुरू असताना काही कारभाऱ्यांकडून राजकीय दबावदेखील आल्याची चर्चा महापालिकेत आहे. त्यामुळे या अहवालात काय नमूद करण्यात आले आहे, कोणा कोणाला दोषी ठरविण्यात आले आहे, याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिलेली आहे. येत्या एक दोन दिवसात त्यावर प्रशासक बलकवडे या निर्णय घेण्याची शक्यता आहे.
संजय भोसले कारवाईच्या रडारवर ?
तक्रारदार भूपाल शेटे यांनी तत्कालिन करनिर्धारक संजय भोसले यांच्या विरोधात तक्रारी दिल्या आहेत. त्याचे काही पुरावेदेखील त्यांनी प्रशासकांना सादर केले आहेत. त्यामुळे ते कारवाईच्या बाबतीत रडारवर असल्याची चर्चा आहे. भोसले यांचा पाच प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे शेटे यांनी पुरावे दिले होते.