वाढीव वीजबिलांची जुना बुधवार पेठेत होळी, मुंडण करून महावितरणचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 19:16 IST2020-07-03T19:14:48+5:302020-07-03T19:16:43+5:30
महावितरण कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांची शुक्रवारी शिवसेनेतर्फे जुना बुधवार पेठेत होळी करण्यात आली. वाढीव दिलेली बिले कमी करावीत अथवा बिलात ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

कोल्हापूर शहरातील शिवसेनेच्या जुना बुधवार पेठ शाखेतर्फे वाढीव वीज बिलांची शुक्रवारी होळी करण्यात आली; तसेच संदीप डोईफोडे या कार्यकर्त्याने मुंडण करून महावितरणचा निषेध केला. छाया : आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : महावितरण कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांची शुक्रवारी शिवसेनेतर्फे जुना बुधवार पेठेत होळी करण्यात आली. वाढीव दिलेली बिले कमी करावीत अथवा बिलात ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ग्राहकांच्या शंकांचे निरसन झाल्याशिवाय वीज बिल भरणार नाही; त्यामुळे जर वीज कनेक्शन बंद केले तर महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला.
महावितरण कार्यालयाकडून तीन महिन्यांचे एकत्रित बिल भरमसाट वाढून आलेले आहे. सरासरीपेक्षा दुप्पट बिल आकारणी झाल्यामुळे ग्राहकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या बुधवार पेठ शाखेतर्फे शुक्रवारी दुपारी जुना बुधवार पेठ तालीमसमोर निदर्शने करण्यात आली. वाढीव बिलांची होळी करण्यात आली; तसेच मुंडण करून महावितरणचा निषेध करण्यात आला.
कोरोना महामारीमुळे मीटर वाचन बंद होते. वीज बिल वितरण केंद्र बंद होते. अशा वेळी सरासरी रीडिंग घेणे आवश्यक होते. तीन महिन्यांचे बिल पाच हजारांपेक्षा जास्त असल्यामुळे ग्राहकांना ते एकाच वेळी भरणे अशक्य आहे. त्यामुळे ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनाचे नेतृत्व शाखाप्रमुख कपिल नाळे, उदय भोसले, किशोर घाटगे, राहुल घाटगे, कल्पेश नाळे, सचिन क्षीरसागर, नीलेश हंकारे, विनायक नाईक, विनोद हजारे, शफीक शेख, किरण होगाडे यांनी केले.