महामार्गाचे लोखंड पुन्हा चोरीला!
By Admin | Updated: August 5, 2014 00:04 IST2014-08-04T22:49:34+5:302014-08-05T00:04:29+5:30
चोरटे सुसाट : भुयारी गटारे देतात अपघातांना आमंत्रण

महामार्गाचे लोखंड पुन्हा चोरीला!
सातारा : महामार्गावरील सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक व गटारावरील झाकणे भुरट्या चोरांनी हातोहात लंपास करण्याचा प्रकार वाढत आहेत. याकडे कोणीच लक्ष देत नसल्यामुळे महामार्गाचे लोखंड पुन्हा चोरांच्या उत्पन्नाचे स्त्रोत बनू लागले आहेत.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्याजवळ सुरक्षिततेच्या दृष्टीने लोखंडी संरक्षक सळ्या लावण्यात आल्या आहेत. महामार्गावर चारचाकी जाताना या रस्त्यावर मोकाट जनावरे, भटकी कुत्री व माणसांच्या वावराला अटकाव आणण्यासाठी या सळ्या येथे लावण्यात आल्या होत्या. तर दुसरीकडे महामार्गावर पावसातील पाणी साठून राहू नये म्हणून महामार्गालगतच पाच फूट खोल गटारे काढण्यात आली आहेत. या गटारांवर सिमेंट-काँक्रिटची झाकणे बसविण्यात आली आहेत. मात्र, काही भुरट्या चोर इतरांची नजर चुकवत रात्री-अपरात्री ही गटारांवरील झाकणे फोडून यातील लोखंडी बार काढून विकत आहेत. साधारण: एका झाकणात चार किलोच्या आसपास लोखंड मिळते. हे लोखंड विकले तर एकावेळी सुमारे शंभर ते सव्वाशे रुपये मिळतात. या सुरक्षित चोरीची चोरट्यांना चटक लागली असल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने लावलेल्या अडथळ्यांचे गजही कटर मशीन व हेक्सा ब्लेडने कापण्यात येते. यामुळे महामार्गाचे लाखोंचे नुकसान होत आहे. यामुळे महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, पुण्यापासून कऱ्हाडपर्यंत पुलावरील लोखंडी गज, दिशादर्शक फलक, गटारावरील झाकणे, बॅरेगेट यांची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. यावर कोणतीही कारवाई होत नाही. दुसरीकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने लावलेल्या या गोष्टी चोरीला जात असल्याने आजपर्यंत हजारो प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला
आहे. (प्रतिनिधी)
तक्रार नसल्यामुळे चोरटे मोकाट
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर विद्युत खांब नसणे, हे या चोरट्यांचे मोठे भांडवल ठरत आहे. संपूर्ण अंधार पसरल्यावर हे चोरटे आपल्या साहित्यानिशी महामार्गावर जातात. कुठलीच संरक्षक यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे चोरटे बिनबोभाट आपले काम मार्गी लावतात. आपले काम साध्य झाल्यानंतर पुन्हा सगळे सामान घेऊन हे चोरटे मार्गस्थ होतात. महामार्गावर कितीही ऐवज चोरीला गेला तरीही त्याची तक्रार कोणीही कुठेच करत नाही. त्यामुळे या चोरीची दखल कोणीच घेत नसल्याने चोरटे मोकाट झाले आहेत. ‘दिसलं लोखंड की चोर आणि विक भंगारात’ हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम झाला आहे.