कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि नंतरच्या काळात मृत्यूही सुरू झाले. सप्टेंबर २०२० मध्ये रुग्णही वाढत गेले आणि मृत्यूही वाढत गेले. गेल्यावर्षी सर्वाधिक मृत्यू हे सप्टेंबरच्या अखेरीस ३४ नोंदले गेले; परंतु एप्रिल २०२१ मध्ये याही पुढे जाऊन सर्वाधिक ४१ मृत्यू नोंदवले गेले. या दहा दिवसांत रोज २१ पासून ३५ पर्यंत मृत्यू सुरू आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या दोन महिन्यांमधील झालेल्या मृत्यूंचे डेथ ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या २१७८ मृत्यूंपैकी १६९० मृत्यूंची कारणे नोंदवण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे श्वसनविषयक त्रास असणाऱ्यांची म्हणजेच इली या आजार असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याखालोखाल सारीच्या आजारामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. अनुक्रमे ४५० आणि ३२१ जणांचा मृत्यू हा इली आणि सारीमुळे झाला आहे. ताप, खोकला, सर्दी, श्वसनविषयक त्रास अशा या आजारांचे स्वरूप असून त्याने गंभीर स्वरूप धारण केले की त्यात रुग्णाचा मृत्यू होतो. दमा आणि धाप लागण्याचा विकार असणाऱ्या २४० जणांचा मृत्यू झाला असून रक्तदाब असणाऱ्या ११७ तर मधुमेह असणाऱ्या १०१ जणांचा मृतांमध्ये समावेश आहे.
विविध आजारांचे एकत्रीकरण झालेल्या रुग्णांना कोरोनाच्या काळामध्ये अधिक त्रास होता आणि त्यातच त्या रुग्णावर उपचार करताना मर्यादा येतात. त्यामुळे या काळात वयाच्या ६० वर्षांनंतर मृत्यू पावलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
चौकट
डेथ ऑडिटमध्ये केवळ आजाराची माहिती नाही
जिल्ह्यात जे डेथ ऑडिट करण्यात येणार आहे ते नेमक्या कोणत्या आजारामुळे रुग्ण दगावला एवढ्यापुरते मर्यादित नाही. तर मृत्यूबाबत प्रशासकीय व वैद्यकीय कारणे याची चौकशी करणे, मृत्यूबाबत प्रशासकीय हलगर्जीपणा झाला असल्यास त्याची माहिती घेणे, मृत्यूच्या कारणांची पडताळणी करून भविष्यात मृत्यू होऊ नयेत म्हणून प्रशासकीय किंवा वैद्यकीय उपाययोजना सुचवणे व त्याच्या अंमलबजावणी नियंत्रण ठेवणे या व्यापक मुद्द्यांचा समावेश या डेथ ऑडिटमध्ये करण्यात आला आहे.
चौकट
१) मार्च महिन्यात जिल्ह्यात एकूण मृत्यू - २१७५
कोरोनामुळे मृत्यू - २७
२) एप्रिल महिन्यात जिल्ह्यात एकूण मृत्यू २१६८
कोरोनामुळे मृत्यू ४१४
यामध्ये इतर जिल्ह्यांतील मृतांचाही समावेश आहे.
कोट
ज्येष्ठ नागरिक ज्यांना काही ना काही व्याधी आहेत अशांचा मृत्यू झाल्याचे कोरोना काळातील मृत्यूंच्या कारणांकडे पाहिल्यावर जाणवते. श्वसनविषयक त्रास, ताप, खोकला अंगावर न काढता असा त्रास जाणवल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल होणे हिताचे ठरते. ज्येष्ठ नागरिकांबाबत तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
-डॉ. योगेश साळे
जिल्हा आरोग्य अधिकारी