‘डिजिटल इंडिया’साठी उच्च शिक्षणच सक्षम

By Admin | Updated: November 27, 2015 01:04 IST2015-11-27T00:52:49+5:302015-11-27T01:04:33+5:30

जी. रघुरामा : पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेस शिवाजी विद्यापीठात शानदार प्रारंभ

Higher education for 'Digital India' is enabled | ‘डिजिटल इंडिया’साठी उच्च शिक्षणच सक्षम

‘डिजिटल इंडिया’साठी उच्च शिक्षणच सक्षम

कोल्हापूर : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला यशस्वी करण्याची सर्वाधिक क्षमता उच्च शिक्षण क्षेत्रातच आहे, असे प्रतिपादन ‘बिट्स पिलानी’चे माजी संचालक व गोव्याच्या के. के. बिर्ला कॅम्पस्चे प्रा. जी. रघुरामा यांनी केले. शिवाजी विद्यापीठ व भारतीय विश्वविद्यालय संघ (ए.आय.यू.) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी आयोजित
केलेल्या दोन दिवसीय पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते ‘डिजिटल इंडिया व उच्च शिक्षण’ या विषयावर बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ए.आय.यू.चे सरचिटणीस प्रा. फुरकान कमर होते, तर बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एच. महेशप्पा प्रमुख उपस्थित होते.
प्रा. रघुरामा म्हणाले, डिजिटल इंडिया अभियानाच्या यशस्वितेमध्ये आर्थिक व पायाभूत तांत्रिक बाबींचा अडथळा असला तरी भारताच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून त्याकडे अत्यंत सकारात्मकपणे पाहण्याची गरज आहे. माहिती-तंत्रज्ञान व दळणवळण क्रांतीमुळे सुविधांचा होणारा गतीमान विकास या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण क्षेत्रात अनेकानेक उपयुक्त व्यासपीठे निर्माण होत आहेत. त्यांचे लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विद्यापीठांसह सर्व शिक्षण संस्थांनी तत्परतेने प्रयत्न केले पाहिजेत. विद्यापीठे डिजिटल इंडिया अभियानामध्ये व्यापक सहभाग नोंदवू शकतात. त्याचप्रमाणे त्याचे लाभही घेऊ शकतात. डिजिटल इंडिया अभियानातील डिजिटल लॉकर सुविधेचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिकृतपणे आॅनलाईन प्रमाणपत्रे, पदवी कशाप्रकारे प्रदान करता येऊ शकतील, याचा विचार करता येईल. आॅनलाईन परीक्षा, असेसमेंट, प्रवेश प्रक्रिया, सुपर फॅकल्टी किंवा मॅसिव्ह आॅनलाईन अभ्यासक्रम त्याचप्रमाणे नवनिर्मिती व उद्योजकता प्रशिक्षण व कौशल्य विकास आदींबाबतही या अभियानाचा चांगला वापर करून घेता येऊ शकतो. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसाठी समाजमाध्यमांचा उपयुक्त वापर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अद्ययावत अभ्यासक्रम निर्मितीसाठीही आॅनलाईन व्यासपीठाचा प्रभावी वापर करता येईल.
परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते वटवृक्षाला पाणी घालून झाले. ए.आय.यू.चे साप्ताहिक ‘युनिव्हर्सिटी न्यूज’च्या विशेषांकाचे प्रकाशन झाले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी आभार मानले. यावेळी शहीद दिनानिमित्त शहिदांच्या स्मृतींना अभिवादन केले, तर संविधान दिनानिमित्त प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
चार राज्यांतील कुलगुरू व त्यांच्या प्रतिनिधींसह ए.आय.यू.चे सहसचिव सॅमसन डेव्हिड, सहसचिव वीणा भल्ला, ‘युनिव्हर्सिटी न्यूज’च्या संपादक डॉ. रमा देवी पाणी, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख पी. टी.
गायकवाड यांच्यासह विविध अधिविभागप्रमुख, प्राचार्य, शिक्षक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आॅनलाईन : शिक्षकांची जबाबदारी वाढली
उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात ‘डिजिटल इंडिया’ अभियानाच्या माध्यमातून देशाचे चित्र बदलण्याची क्षमता आहे. सातत्याने होणारे बदल स्वीकारणे, त्यांना सामोरे जाणे आणि विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्याची प्रमुख जबाबदारी विद्यापीठांवर आहे. उच्चशिक्षण क्षेत्रातील धुरिणांनी जगाला मार्गदर्शन करण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात उलट चित्र दिसते. हे चित्र नवतंत्रज्ञानाच्या आधारावर बदलण्याची गरज आहे. त्यासाठी देशातील जास्तीत जास्त तरुणांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सद्य:स्थितीत विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्ये प्रचंड लवचिकता आणण्याची गरज आहे. स्वत:च्या वेळेनुसार व गरजेनुसार आॅनलाईन स्वरुपात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना शिक्षकांवर त्यांचे शंका निरसन करण्यासाठी तयार राहण्याची जबाबदारी वाढली आहे, असे प्रा. फुरकान कमर म्हणाले.

Web Title: Higher education for 'Digital India' is enabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.