कोल्हापूर : महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण नांदणी मठाकडे पाठविण्यासंबंधी उच्चस्तरीय समितीने निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. ‘पेटा’कडून मात्र हत्तीण मठाकडे पाठविण्यास विरोध करण्यात आला.
राज्य सरकार आणि मठाकडून दाखल पुनर्विचार याचिकेवर न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्यासमोर सुनावणी झाली.
सरकारचे वकील सिद्धार्थ धर्माधिकारी म्हणाले, न्यायालयाच्या आदेशावरून हत्तिणीला ‘वनतारा’ला पाठविले. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने सरकार, वनतारा आणि नांदणी मठाच्या समन्वयातून हत्तिणीला परत पाठविण्यासंबंधी मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. यानुसार मठाच्या जागेत ‘वनतारा’च्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत हत्ती पुनर्वसन केंद्र तातडीने उभे करून तेथे हत्तिणीवर उपचार करण्याचे ठरविण्यात आले.
‘पेटा’चे वकील एम. अय्यर म्हणाले, हत्तिणीची तब्येत खराब आहे. सध्या मठाकडे तिच्यावर उपचार करण्यासाठी कोणत्याच सुविधा नाहीत. यावर न्यायालयानेही उपचार कसे करणार, असा प्रश्न करीत याबाबतचा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, असा आदेश दिला.