सहा लाख महिलांमध्ये हिमोग्लोबीनचा तुटवडा

By Admin | Updated: May 28, 2015 01:01 IST2015-05-28T00:38:46+5:302015-05-28T01:01:22+5:30

आहाराकडे दुर्लक्षाचा परिणाम : जिल्ह्यात कर्करोग, मधुमेह, मुदतपूर्व प्रसुतीच्या प्रमाणातही वाढ--स्त्री आरोग्य दिन विशेष

Hemoglobin deficiency in six lakh women | सहा लाख महिलांमध्ये हिमोग्लोबीनचा तुटवडा

सहा लाख महिलांमध्ये हिमोग्लोबीनचा तुटवडा

सांगली : रक्तातील हिमोग्लोबीनचे कमी प्रमाण, जंतूंचा प्रसार, सकस आहाराचा व उपचारांचा अभाव यामुळे जिल्ह्यातील महिलांत मुदतीपूर्वी प्रसुतीचे (प्रिमॅच्युअर डिलिव्हरी) प्रमाण वाढले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण १४ लाख ३५ हजार ७२८ महिलांपैकी सहा लाख महिलांचे हिमोग्लोबीन १० टक्क्यापेक्षा कमी आहे. शिवाय कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी विकारांचे प्रमाण महिलांमध्ये वाढल्याचे आढळून आले आहे.
महिलांचे आरोग्यमान सुधारावे आणि त्यांच्या सबलीकरणासाठी केंद्र व राज्य शासन वर्षाला कोट्यवधीचा निधी खर्च करीत आहे. महिला मेळावे घेऊन त्यांचे आरोग्य विषयावर जनजागृती करण्याचा प्रयत्न होत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दि. २६ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधित जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आरोग्य शिबिर घेऊन महिलांची तपासणी केली. या तपासणीमध्ये तीस वर्षापेक्षा जास्त वयोगटाच्या महिलांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग (गर्भाशय, स्तनाचा, मौखिक) या गंभीर आजारांचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे. आहाराकडे दुर्लक्ष, नियमित आरोग्य तपासणी नाही, महिलांमध्ये तंबाखू व तंबाखूयुक्त मिश्रीचा वापर ही प्रमुख कारणे दिसत आहेत.
जिल्ह्यात १४ लाख ३५ हजार ७२८ महिलांची संख्या आहे. यापैकी सहा लाख महिलांचे हिमोग्लोबीन १० टक्केपेक्षा कमी आहे. त्यातील २० टक्के महिलांमध्ये सात ते पाच टक्के हिमोग्लोबीचे प्रमाण असल्याचे आढळून आले आहे. या सर्व आजारांमुळेच एकट्या सांगली जिल्ह्यात आईच्या पोटात गुदमरून १६, तर कमी वजनामुळे ७८ बालकांचा मृत्यू झाला आहे. परिणामी, ‘सुदृढ बालक, सशक्त युवक, संपन्न महाराष्ट्र’ अभियानाचा फज्जा उडाला आहे. महापालिका क्षेत्रात याच कारणाने आजही ग्रामीण भागात मुदतीपूर्वी प्रसुतीचे प्रमाण अधिक आहे. या सर्व गोष्टींवर नियंत्रण करण्यासाठी सरकार राजीव गांधी जीवनदायी योजनेसह अनेक उपक्रम राबविते. मात्र ते केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)

मातामृत्यूचे प्रमाण घटले
गरोदरपणाच्या काळात त्या महिलेकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे, नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वीच प्रसुती होत आहे. त्याचा बाळाच्या वाढीवर परिणाम होतो. परिणामी, मृत्यू ओढवतो. त्यासाठी गरोदर मातांनी आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. जि. प. आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. आहाराविषयीही मार्गदर्शन केले जात आहे. यामुळेच सध्या एक लाख महिलांमध्ये ६० महिलांचा मृत्यू, असे मातामृत्यूचे प्रमाण होत आहे. बालमृत्यूचेही प्रमाण एक हजारात १७ असे असून ते कमी झाले आहे, असे मत जिल्हा परिषदेचे जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी बी. एस. गिरीगोसावी यांनी व्यक्त केले.


नियमित तपासणी हाच उपाय
गरोदर मातांनी योग्य, सकस आहार घेऊन व वेळेवर तपासणी करून आरोग्याची काळजी घेतल्यास निश्चितच बालमृत्यू रोखले जातील. गरोदरपणाच्या कालावधित कोणतेही आजार महिलांनी अंगावर काढू नयेत. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास व्यवस्थित प्रसुती होईल. बाळ आणि माता सुरक्षित राहण्यासाठी दोघांचाही आहार आणि उपचार महत्त्वाचे आहेत, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विद्या जाधव यांनी सांगितले.

Web Title: Hemoglobin deficiency in six lakh women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.