ऐनापुरे यांची हॅम मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 20:40 IST2019-08-14T20:39:07+5:302019-08-14T20:40:22+5:30
कोल्हापूरच्या महापुरात फारशी जीवितहानी झाली नाही, याचे कारण नितीन ऐनापुरे आणि त्यांच्या चमूने हॅम रेडिओच्या माध्यमातून केलेली मदत.

ऐनापुरे यांची हॅम मदतीला
कोल्हापूर : कोणतीही आपत्ती आली, की माणूस घटनास्थळी धावून जात मदत करण्याचा प्रयत्न करत असतोच; पण माणसांच्या मदतीशिवाय तांत्रिक मदतीची जोड असेल तर मदतकार्य सुसूत्र आणि नियोजनपद्धतीने केल्यास प्राणहानी कमी होते. कोल्हापूरच्या महापुरात फारशी जीवितहानी झाली नाही, याचे कारण नितीन ऐनापुरे आणि त्यांच्या चमूने हॅम रेडिओच्या माध्यमातून केलेली मदत.
व्हीयूटूसीएएन ही त्यांची आंतरराष्ट्रीय कॉलसाईन आहे. १0 वॉकी टॉकी आणि आॅपरेटर्सच्या साहाय्याने त्यांनी या महापुरात काम करून कोणतीही हानी होऊ दिली नाही. त्यांच्या घरातच कायमस्वरूपी अद्ययावत यंत्रणा आहे; पण महापुराच्या काळात महामार्गावर त्यांनी बेसकॅम्प सुरू केला, तर जोतिबावरून रिपिटर यंत्रणेद्वारे संदेशवहन सुरळीत केले. ऐनापुरे आणि त्यांच्या चमूने या पायाभूत संदेशवहन यंत्रणेच्या माध्यमातून शिंगणापूर, आंबेवाडी, चिखली येथील ३००० लोकांना महापालिका आणि आपत्कालीन यंत्रणेच्या पाच रबर बोटींतून बाहेर काढले.
शिरोली नाका ते तावडे हॉटेल मार्गावर रोज ३५ ते ४0 फेऱ्यांद्वारे अनेकांची सुटका केली. २00 मीटरच्या अंतरावर आॅपरेटर ठेवून रुग्णवाहिकेतून अत्यवस्थ रुग्ण, रुग्णालय आणि अन्नछत्रासाठी लागणारे गॅस सिलिंडर, नैसर्गिक मृत्यू झालेले मृतदेह, पासपोर्ट संपलेल्या परदेशी युवतीसोबत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुटका करण्यात आली.