अत्यवस्थ रुग्णांची हेळसांड, शिक्षणाचा खेळखंडोबा
By Admin | Updated: April 7, 2015 01:31 IST2015-04-06T21:24:02+5:302015-04-07T01:31:39+5:30
ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया : आणखी किती जीव गेल्यावर सरकारला जाग येणार?

अत्यवस्थ रुग्णांची हेळसांड, शिक्षणाचा खेळखंडोबा
राम करले - बाजारभोगाव -रस्त्याचा पत्ता नसल्याने दळण-वळणाच्या सुविधांचा अभाव, त्यामुळे भैरेवाडी आणि धोंडेवाडी येथील अत्यवस्थ रुग्णांना खाटाचा आधार घेऊन रुग्णालयात यावे लागत असल्याचे भयानक वास्तव आहे. रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने प्रसंगी जीव गमवावा लागल्याची उदाहरणे दरवर्षी घडत आहेत. आणखी किती जीव गेल्यावर सरकारला जाग येणार? अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
डोंगराच्या कुशीत ही दोन्ही गावे असल्याने येथे खासगी डॉक्टर जाण्यास अथवा राहण्यास तयार नसतात. असुविधा येथील लोकांच्या पाचवीला पूजल्या आहेत. रुग्णांना सेवा देण्याऐवजी स्वत:लाच सलाईन लावण्याची वेळ येत असल्याचे डॉक्टर मंडळी सांगतात. रोजची पायपीट करणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. परिणामी बाजारातून आणलेल्या चिठ्ठीतील गोळ्या, औषधे हाच येथील लोकांचा वैद्यकीय उपचाराचा भाग ठरत आहे. मात्र, मागासलेपणा, परंपरावादी प्रथेमुळे गावठी औषधोपचार रुग्णांना नित्याचा बनला आहे. एखाद्या अत्यवस्थ रुग्णाला अथवा गरोदर महिलेला रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी सोनुर्ले अथवा कासारवाडी येथे खाटावरून आणावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक व सेविका लसीकरणादिवशीच फक्त लोकांना दर्शन देतात. एरवी जगण्यासाठी संघर्ष नित्याचा बनला आहे. येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर करावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
धोंडेवाडी येथे अंगणवाडी नसल्याने येथील चिमुकल्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही. याशिवाय भैरेवाडी अंगणवाडीला हक्काची इमारत नसल्याने भाड्याच्या घरात विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याची वेळ आली आहे. इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने इमारत बांधण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे धूळखात पडला आहे. दऱ्या-खोऱ्यातील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक विकासासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी पालकांची मागणी आहे.
धोंडेवाडी गावात अंगणवाडी मंजूर करण्यासाठी शासन दरबारी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. मात्र, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे शालेय पोषण आहारापासून येथील विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागते. तीन कि.मी. अंतरावरील डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या सोनुर्ले अंगणवाडीला येथील विद्यार्थी जोडण्यात आले होते. दरम्यान, एक महिन्यापूर्वी भैरेवाडी अंगणवाडीला हे विद्यार्थी वर्ग करण्यात आले आहेत. भैरेवाडी ते धोंडेवाडी एकाच पट्ट्यात असले, तरी परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
भैरेवाडी येथे २००९ मध्ये अंगणवाडी सुरू करण्यात आली. असुविधांमुळे विद्यार्थी अंगणवाडीत पाठविण्यास प्रारंभी पालकांनी टाळाटाळ केली. मात्र, सेविका छाया मुगडे, मदतनीस अनिता खोदल यांनी परिश्रमाच्या जोरावर विद्यार्थ्यांचा बौद्धिक व शारीरिक विकास करून शैक्षणिक दिशा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे पालकांनी चांगला प्रतिसाद दिला.
अंगणवाडीला इमारतीसाठी प्रशासनाचे सकारात्मक प्रयत्न आहेत. मात्र, खासगी अथवा सरकारी जागा उपलब्ध होत नसल्याने इमारत बांधायची कोठे? हा खरा प्रश्न आहे. सोनुर्ले ग्रामसभेमध्ये इमारतीसाठीच्या जागेबाबत वेळोवेळी फक्त चर्चा झाल्या. मात्र, जागा मिळविण्यासाठी कुणाकडूनही सकारात्मक प्रयत्न झालेले नाहीत. (समाप्त)
जागेअभावी भैरेवाडी अंगणवाडीच्या इमारतीचा प्रश्न रेंगाळला आहे. ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून देऊन सामाजिक बांधीलकी जोपासावी.
- विद्या संजय शेट्ये,
अंगणवाडी पर्यवेक्षिका.
शाहूवाडी तालुका