तावडे हॉटेलप्रकरणी शुक्रवारी सुनावणी
By Admin | Updated: July 2, 2014 00:49 IST2014-07-02T00:46:53+5:302014-07-02T00:49:55+5:30
कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण कारवाई तात्पुरती ‘जैसे थे’ ठेवण्याच्या दिलेल्या आदेशावर शुक्रवारी (दि.४) उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

तावडे हॉटेलप्रकरणी शुक्रवारी सुनावणी
कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण कारवाई तात्पुरती ‘जैसे थे’ ठेवण्याच्या दिलेल्या आदेशावर शुक्रवारी (दि.४) उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मिळकतधारकांनी आणखी पुरावे व कागदपत्रांची पूर्तता न्यायालयात केली आहे. महापालिका प्रशासनाने कारवाईच्या माहितीसह प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. अंतरिम सुनावणी सुरू होणार असल्याने मिळकतधारकांसह महापालिकेच्या नजरा न्यायालयाच्या निकालाकडे लागल्या आहेत.
तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील महापालिकेच्या ट्रक टर्मिनस, कचरा डेपो व ना विकास क्षेत्र, या आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या अतिक्रमणावर महापालिकेने २६ मे पासून हातोडा फिरविण्यास सुरुवात केली होती. महापालिकेने अतिक्रमणाचा दर्शनी भाग मोकळा करत गांधीनगर मुख्य रस्त्यावर २४ मीटरची आखणी केली.
दरम्यान, मिळकतधारकांसह उचगाव ग्रामपंचायतीने या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने उचगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीबाबतच्या याचिकेवर सुनावणी देताना तात्पुरती अतिक्रमण कारवाई थांबविण्याचे आदेश दिले होते, तसेच महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.
त्यानंतर तावडे हॉटेल परिसर कशाप्रकारे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट आहे, याबाबत पुराव्यांसह महापालिके ने प्रतिज्ञापत्र सादर करून म्हणणे मांडले आहे. कारवाईत पाडलेल्या इमारतींसह न्यायालयाचा आदेश झुगारून केलेल्या बांधकामांचे फोटोसह चित्रीकरण महापालिकेतर्फे न्यायालयात सादर केले आहे. महाराष्ट्र राज्य नगररचना कायदा १९८०, कलम ५२ व ५३ अ नुसार तावडे हॉटेल परिसरातील अवैध व विनापरवाना मिळकतधारकांना पोलीस बंदोबस्तात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिसा बजावताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना व्यापाऱ्यांनी धक्काबुक्की केली होती. याबाबतही न्यायालयात वाच्यता केल्याने महापालिकेची बाजू भक्कम मानली जाते.
मात्र, महापालिकेने यापूर्वीही न्यायालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यात हयगय केल्याने मात खाल्ली होती. आता पुन्हा अशी दगाबाजी घरच्या भेद्यांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.