नगराध्यक्षांच्या बंडास कॉँग्रेस आघाडीचा धक्का
By Admin | Updated: January 14, 2015 23:42 IST2015-01-14T21:00:22+5:302015-01-14T23:42:49+5:30
इचलकरंजी नगरपालिका : ‘स्थायी’च्या दोन्ही बैठका गणपूर्तीअभावी रद्द

नगराध्यक्षांच्या बंडास कॉँग्रेस आघाडीचा धक्का
इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडील विविध विषयांसाठी आयोजित केलेल्या स्थायी समितीच्या दोन्ही बैठकांना अनुपस्थित राहून सत्तारूढ कॉँग्रेस आघाडीने नगराध्यक्षांच्या बंडाला जोरदार धक्का दिला. आज, बुधवारच्या दोन्ही बैठका गणपूर्तीअभावी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना रद्द कराव्या लागल्या.नगराध्यक्षा बिरंजे यांचा नगराध्यक्षपदाचा ठरलेला पाच महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्यास नकार देऊन बंड केले. त्याला विरोधी शहर विकास आघाडी व राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील कारंडे गटाने पाठिंबा दिला. नगराध्यक्षांच्या या कृतीची दखल घेत राष्ट्रीय कॉँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी माजी नगरसेवक सतीश डाळ्या यांनी त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव दिला; पण आपण राजीनामा देणार नाही, या भूमिकेशी बिरंजे ठाम राहिल्या.अशा पार्श्वभूमीवर मक्तेदारांची बिले अदा करणे, नगराध्यक्षांनी वेळोवेळी दिलेल्या हुकुमांना कार्योत्तर मंजुरी देणे, सन २०१४-१५च्या आर्थिक अंदाजपत्रकास मंजुरी देणे अशा विषयांवर नगराध्यक्षा बिरंजे यांनी आज स्थायी समितीच्या सलग दोन बैठका आयोजित केल्या होत्या. या बैठकांना फक्त नगराध्यक्षा बिरंजे व शहर विकास आघाडीचे नगरसेवक सयाजी चव्हाण हे दोघेच उपस्थित राहिले, तर उपनगराध्यक्ष रणजित जाधव, रवी रजपुते, महिला व प्रमिला जावळे, सुजाता भोंगाळे, भाऊसाहेब आवळे, शिक्षण सभापती शोभा कांबळे, संजय तेलनाडे व संजय केंगार हे अनुपस्थित राहिले. नगराध्यक्षा बिरंजे यांना या दोन्ही बैठका गणपूर्तीअभावी रद्द कराव्या लागल्या.नगराध्यक्षांचे बंड, त्याला विरोधी पक्षाने दिलेला पाठिंबा आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील कारंडे गटाचे सहकार्य अशा पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा बिरंजे यांनी प्रथमच स्थायी समितीच्या या दोन्ही बैठका आयोजित केल्या होत्या. दोन्हीही बैठकांना आपले सभापती व नगरसेवक अनुपस्थित ठेऊन राष्ट्रीय व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीने जोरदार धक्का दिला, अशी चर्चा होती. (प्रतिनिधी)