कोल्हापूर : चंदगड पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबलच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया करण्यासाठी ३० हजारांची खंडणी उकळणारा हेडक्लार्क संतोष मारुती पानकर आणि धनश्री उदय जगताप (दोघे रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. तसेच या गुन्ह्याचा तपास शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्याकडे वर्ग करण्यात आला. पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी निलंबनाचे आदेश काढले. दरम्यान, पानकर याने बदलीसाठी आणखी दोन पोलिसांकडून ६० हजार रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले.चंदगड पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल रितेश ढहाळे यांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केला होता. पोलिस अधीक्षकांनी बदलीचा अर्ज मंजूर केल्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना विभागाचा प्रमुख संतोष पानकर याने शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील कॉन्स्टेबल धनश्री जगताप हिच्याकरवी ढहाळे यांच्याकडे पैशांची मागणी केली. जगताप हिने ऑनलाईन ३० हजार रुपये स्वीकारून त्यातील २० हजार रुपये पानकर याला पाठवले होते. हा प्रकार उघडकीस येताच पानकर याच्यावर अटकेची कारवाई झाली आहे, तर जगताप हिची प्रकृती बिघडल्याने ती खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी तातडीने पानकर आणि जगताप या दोघांवर निलंबनाची कारवाई केली. शहर उपअधीक्षक अजित टिके यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे.बदल्यांचे रॅकेटआस्थापना शाखेतील प्रमुखासह काही कर्मचारी बदल्यांचे रॅकेट चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पानकर आणि जगताप यांनी बदल्यांसाठी चंदगड पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल अश्विन संतोष गुंड आणि मेहुल वसंत आरज यांच्याकडून प्रत्येकी ३० हजार रुपये घेतल्याचे तपासातून समोर आले. आणखी कोणाकडून पैसे घेतले असल्यास त्यांनी तक्रारी कराव्यात, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.मुख्यालयातूनच सुरुवातलाचखोरी, खंडणीचे प्रकार पोलिस दलाची प्रतिमा मलीन करीत आहेत. भ्रष्ट कर्मचारी, अधिकाऱ्यांना हकलण्याची मोहीम जिल्हा पोलिस दलात राबवली जाणार आहे. याची सुरुवात मुख्यालयातून केल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.
Kolhapur Crime: बदलीसाठी खंडणी घेणारे पानकर, जगताप निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:12 IST