‘तो’ खून अनैतिक संबंधातून
By Admin | Updated: July 1, 2014 00:56 IST2014-07-01T00:51:25+5:302014-07-01T00:56:30+5:30
निलेवाडी खून प्रकरण : प्रेयसीसह दोघांना अटक

‘तो’ खून अनैतिक संबंधातून
पेठवडगाव : अनैतिक संबंधातून सुशांत दत्ता मोरे (वय २२, रा. संगमनगर, सातारा) यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना आज, सोमवारी अटक केलीे. संतोष पुंडलिक कापसे (२४, मूळ गाव शिरगुप्पी, ता. चिकोडी, जि. बेळगाव), दमयंती राजू यादव (३०, मूळगाव इंदिरानगर, इचलकरंजी, दोघेही सध्या रा. वठारतर्फ वडगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
निलेवाडी (ता. हातकणंगले) येथे सहा दिवसांपूर्वी अज्ञाताचा मृतदेह पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत निर्जनस्थळी मिळाला होता. त्यानंतर दोन दिवसांनंतर त्या मृतदेहाची ओळख पटली. सुशांत मोरे असे त्यांचे नाव असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी सांगितले की, सुशांत मोरे हा मूळचा संगमनगरचा आहे. त्यांच्या वडिलांचा गवंडी कामाचा व्यवसाय आहे. त्यांच्या कामात मदतीसाठी सुशांत येत होता. याच कामावर मदतनीस कामगार म्हणून दमयंती यादव येत होती. यावेळी सुशांत व दमयंती यांचे प्रेमप्रकरण जुळले. सुमारे अडीच वर्षे दोघेजण एकत्र राहत होते. त्यानंतर सुशांत हा दमयंतीस किरकोळ कारणावरून नेहमी त्रास देत होता.
दरम्यान, सातारा येथे संतोष कापसे याने हॉटेल चालविण्यास घेतले होते. येथे कामगार म्हणून दमयंती जात होती. यावेळी संतोष व तिचे प्रेमसंबंध जुळले. याची माहिती सुशांतला समजली. यास त्याने विरोध केला. या त्रासाला कंटाळून संतोष व दमयंती हे वाठारला आले. एका हॉटेलमध्ये संतोष आचारी म्हणून काम करू लागला.
वाठार येथेही येऊन सुशांत या दोघांना त्रास देत होता. असे पोलीस तपासात उघड झाले. सोमवारी (दि. २३) रात्री दहा वाजता सुशांतने धमकीचा फोन केला. रात्री दोन वाजता दुचाकी गाडीवरून वठार येथे राहत्या घरी आला. यावेळी संतोष व दमयंती घरी होते. सुशांतची चाहूल लागल्यामुळे संतोष हा पाठीमागच्या दाराने पळून जात होता, तर सुशांतही पुढील दरवाजा उघडत नसल्यामुळे पाठीमागे आला. यावेळी सुशांतने संतोषला मारहाण करण्यास सुरुवात केली. संतोषने घरातून पळताना हातात बॅट घेतली होती. यावेळी संतोषने सुशांतच्या कपाळावर बॅट मारली. हा घाव वर्मी बसल्यामुळे सुशांतचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर दोघांनी मृतदेह किचन कट्ट्याखाली दिवसभर लपवून ठेवला. मंगळवारी रात्री मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकी गाडीवरून घेऊन गेले; पण रात्री रस्त्यावरील रहदारीमुळे त्यांना यश आले नाही. रस्ता चुकल्यामुळे भीतीने बुधवारी (दि. २५) पहाटे मृतदेह निलेवाडी गावात टाकून पलायन केले.
दरम्यान, निलेवाडी हद्दीत अज्ञात मृतदेहाची वर्दी पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांना सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्याचे बारदान (पोते) मिळाले. तसेच मृतदेहाच्या खिशात सिमकार्डचे रिकामे पाकीट मिळाले. यावरून मृत हा सातारा जिल्ह्यातील असावा. या संशयावरून तपास सुरू केला. मोबाईल कार्डसंबंधी ८ ते १० जणांची विचारपूस केल्यानंतर मृताचे नाव सुशांत मोरे असल्याचे स्पष्ट झाले. मोबाईल कॉल डिटेल्स व घरांच्यानी अनैतिक संबंधाची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक केली. आज, सोमवारी त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.
प्रतिनिधी.