प्रेम व्यक्त न करताच त्यांनी संपविले जीवन; करवीर तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 10:56 AM2021-02-18T10:56:02+5:302021-02-18T11:18:01+5:30

Suicide Kolhapur- दोघेही एकाच समाजातील.. कुटुंबांचा आर्थिक स्तरही जवळपास सारखाच.. दोघांचेही आता कुठे जीवन फुलू लागले होते... त्यातून प्रेमाचे धागे जुळले; परंतु त्याबद्दल विश्वासाने स्वत:च्या आईवडिलांजवळ ती भावना व्यक्त न करताच ते आपल्याला लग्न करू देणारच नाहीत असा टोकाचा समज करून दोघांनीही विष प्राशन करून जीवनच संपविले. करवीर तालुक्यात घडलेली ही घटना कुणाच्याही मनाला चटका लावून जाणारी अशीच आहे.

He ended his life without expressing love; Incidents in Karveer taluka | प्रेम व्यक्त न करताच त्यांनी संपविले जीवन; करवीर तालुक्यातील घटना

प्रेम व्यक्त न करताच त्यांनी संपविले जीवन; करवीर तालुक्यातील घटना

googlenewsNext
ठळक मुद्देप्रेम व्यक्त न करताच त्यांनी संपविले जीवन; करवीर तालुक्यातील घटना आईबाबांनी तुम्हाला घडविले ते याचसाठी का..

विश्वास पाटील

कोल्हापूर : दोघेही एकाच समाजातील.. कुटुंबांचा आर्थिक स्तरही जवळपास सारखाच.. दोघांचेही आता कुठे जीवन फुलू लागले होते... त्यातून प्रेमाचे धागे जुळले; परंतु त्याबद्दल विश्वासाने स्वत:च्या आईवडिलांजवळ ती भावना व्यक्त न करताच ते आपल्याला लग्न करू देणारच नाहीत असा टोकाचा समज करून दोघांनीही विष प्राशन करून जीवनच संपविले.  घडलेली ही घटना कुणाच्याही मनाला चटका लावून जाणारी अशीच आहे.

आईवडिलांनी तुम्हाला लहानाचे मोठे केले ते हे दिवस पाहण्यासाठीच का, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मुलगी अतिशय हुशार. दहावीत ९२ टक्के गुण मिळालेले. अत्यंत धाडसी व जीवनात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द बाळगणारी. एक भाऊ व बहीण शिक्षण घेत असलेले.

कौटुंबिक स्थिती तशी बेताची; परंतु आईवडिलांनी अत्यंत कष्टातून तिला घडविले. दिसायला सुंदर आहे. चांगले करिअर केलेस तर कुठेही चांगले स्थळ येईल, अशी त्यांची भावना. एसटीतून प्रवासाचा त्रास नको म्हणून आईनेच कोल्हापुरात मामाकडे तिला शिक्षणासाठी ठेवले. अकरावीतही तिने चांगले गुण मिळविले. याच दरम्यान गावात दोन घटना घडल्या. एकाच आठवड्यात दोन प्रेमविवाह झाले. त्याचदरम्यान निपाणीजवळचे एक चांगले स्थळ मुलीला आल्यावर गेल्या रविवारी मुलीचे लग्न ठरवून ठेवले.

मुलाची कौटुंबिक स्थिती सधन. वडील सहकारी संस्थेत नोकरीस. मुलगा एकुलता. कुटुंबालाही त्याच्याबद्दल कमालीचा अभिमान. उंचापुरा व भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा.. त्याने लष्करात जावे म्हणून त्याप्रकारचे प्रशिक्षण सुरू असलेले. वडिलांना तर मुलाची केवढी हौस. गेल्याच आठवड्यात शब्द टाकल्यावर वडिलांनी नवी कोरी बुलेट दारात आणून उभी केली.

एवढे जिवापाड प्रेम करणारे आईवडील असूनही त्यानेही त्याचे प्रेम त्यांच्याजवळ व्यक्तच केले नाही. मुलीचे लग्न ठरल्याचे समजल्यावर दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेतला व दिलेल्या शब्दानुसार दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेला विष घेऊन जीवन संपविले. मुलगा आधी गेला व मुलगी त्यानंतर.. परंतु दोघांचाही शेवट एकच.. दोन उमलणारी फुले अकालीच कोमेजून गेली. या मार्गाने तुम्ही जाऊ नका असे त्यांना मायेने जवळ घेऊन सांगणारे कोणच भेटले नसेल का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

भले कुटुंबाचा विरोध होता तर दोघांनाही पळून जाऊन लग्न करण्याचा सोपा पर्याय हाताशी होता. ते जमणार नव्हते तर किमान आईवडील, मित्र, जवळचे नातलग यांच्याकडे प्रेमाची भावना व्यक्त करता आली असती. त्यातून चर्चेतून सहज मार्ग निघू शकला असता; परंतु तसे काहीच न करता एकदम टोकाला जाऊन ज्यांनी तुम्हाला लहानाचे मोठे करण्यासाठी कष्ट उपसले, तुमच्यावर जिवापाड प्रेम केले, त्यांना आयुष्यभराचे दु:ख देऊन तुम्ही चुकीच्या मार्गाने निघून गेलात.. कधीच परत न येण्यासाठी... हा अधिकार तरी मग तुम्हाला कुणी दिला..?

आणखी एक घटना पन्हाळा तालुक्यातील नेबापूर गावची. प्रेम प्रकरणातून विष प्राशन करून नेबापूरच्या २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शेतीवर फवारणी करणारे विषारी तणनाशक प्राशन करून या युवकाने आत्महत्येचा मार्ग पत्करला. वडीलांचे छत्र नव्हते, लहान बहीण आणि आईसोबत तो रहात होता. सेंट्रिंग काम करत घर चालले होते. प्रेमात अपयश आले म्हणून त्याने मंगळवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केेले. परंतु बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. आता त्या विधवा आईने कोणाकडे पहायचे 

नवे आव्हान...

ही घटना एका गावातील असली, तरी अन्य गावांतील सामाजिक स्थिती याहून वेगळी नाही. कुटुंब व्यवस्थेतील नवे आव्हान म्हणून पालकांनी त्याकडे पाहिले पाहिजे. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, दुरावलेले नातेसंबंध, जातीपातीची घट्ट होत चाललेली भावना अशी अनेक कारणे या घटनांच्या मुळाशी आहेत.

Web Title: He ended his life without expressing love; Incidents in Karveer taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.