शिवछत्रपती पुरस्कारांत फुटबॉलचा तिरस्कार!, २८ वर्षांत एकही पुरस्कार नाही

By सचिन भोसले | Updated: July 17, 2023 16:24 IST2023-07-17T16:22:49+5:302023-07-17T16:24:00+5:30

यंदाही क्रीडा खात्याने या निकषांचे कागदी घोडे पुन्हा दाखविल्याने फुटबॉलपटूसह प्रशिक्षकांनी प्रस्तावच सादर केले नाहीत 

Hatred of football in Shiv Chhatrapati Awards | शिवछत्रपती पुरस्कारांत फुटबॉलचा तिरस्कार!, २८ वर्षांत एकही पुरस्कार नाही

शिवछत्रपती पुरस्कारांत फुटबॉलचा तिरस्कार!, २८ वर्षांत एकही पुरस्कार नाही

सचिन भोसले

कोल्हापूर : पाच वर्षांपैकी तीन वर्षे वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत एकही पदक मिळाले नाही. यंदाही क्रीडा खात्याने या निकषांचे कागदी घोडे पुन्हा दाखविल्याने फुटबॉलपटूसह प्रशिक्षकांनी प्रस्तावच सादर केले नाहीत. त्यामुळे १९९४-९५ गाॅडफ्रेड परेरा यांच्यानंतर हा पुरस्कार राज्यातील एकाही फुटबॉलपटू किंवा संघटक, प्रशिक्षकाला मिळालेला नाही.

राज्य शासन दरवर्षी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षक, संघटकांचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करते. यात अनेक खेळांमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेत देशात दबदबा निर्माण केला आहे. मात्र, फुटबॉल क्षेत्रात महाराष्ट्राच्या संघाला वरिष्ठ गट राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत गेल्या पाच वर्षांपैकी तीन वर्षांत एकदाही पदकाला गवसणी घालता आलेली नाही.

मात्र, फुटबॉल मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात खेळला जातो. तरीसुद्धा राज्य शासनाचा क्रीडा विभाग या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी निकष बदलण्याचा साधा विचारसुद्धा करीत नाहीत. त्यामुळे गेल्या २८ वर्षांत एकाही संघटक, फुटबॉलपटू आणि प्रशिक्षकाला हा पुरस्कार मिळू शकलेला नाही.

क्रीडा विभाग म्हणतो

महाराष्ट्रातील एकाही संघाने गेल्या पाच वर्षांतील तीन वर्षांत वरिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत एकही पदक मिळवलेले नाही. राज्यात फुटबॉल विकसित नाही. हा खेळ केवळ केरळ, गोवा, पश्चिम बंगाल येथेच मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. या पुरस्कारासाठी ठरविण्यात आलेल्या निकषात बसत नाहीत. त्यामुळे हा पुरस्कार फुटबॉल क्षेत्रात मिळू शकत नाही. या खेळाचा विकास व्हावा. याकरिता एफसी बार्यनसारखे प्रयोग खात्याकडून सुरू आहेत.

यांच्यानंतर हा पुरस्कार मिळालाच नाही

१९७०-७१- ऐरेक जोसेफ डिसोजा, १९७२-७३- अमरबहादूर गुरुंग, १९७३-७४- मोहम्म अली, १९७५-७६- बंड्या काकडे, १९८५-८६- हेन्री जोसेफ, १९९३-९४- महमद अन्सारी, १९९४-९५- गाॅडफ्रेड परेरा.

खेळ कोणताही असो त्याकरिता राज्य शासनाने निकष बनविले आहेत. त्या निकषात पात्र ठरेल तो खेळाडू, प्रशिक्षक, संघटक या पुरस्कारास पात्र ठरेल. अन्यथा पुरस्कार मिळणार नाही. अद्यापही राज्यात फुटबॉल खेळ विकसित झालेला नाही. -सुहास दिवसे, आयुक्त, क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र

 

शासनाच्या लेखी राज्यात फुटबॉल हा खेळ विकसित नाही. प्रत्येक वर्षी निकषाचा बाऊ करून फुटबॉल क्षेत्रच या पुरस्कारापासून वंचित राहते. त्यामुळे याचा गांभीर्याने राज्य शासनाने विचार करावा. विशेषत: राज्याच्या फुटबॉल संघटनेने तरी निकषाबाबत आवाज उठविणे गरजेचे आहे. -विकास पाटील, माजी फुटबॉलपटू

Web Title: Hatred of football in Shiv Chhatrapati Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.