वाशिमच्या पालकमंत्री पदानंतर हसन मुश्रीफ 'या' पदाचाही देणार राजीनामा, सांगलीतील कार्यक्रमात केले सूतोवाच
By राजाराम लोंढे | Updated: July 22, 2025 11:43 IST2025-07-22T11:42:03+5:302025-07-22T11:43:00+5:30
मंत्रीपद, गोकुळचे अध्यक्ष घरात म्हणून निर्णय

वाशिमच्या पालकमंत्री पदानंतर हसन मुश्रीफ 'या' पदाचाही देणार राजीनामा, सांगलीतील कार्यक्रमात केले सूतोवाच
राजाराम लोंढे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा आपण लवकरच राजीनामा देणार असल्याचे सूतोवाच, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगली येथील कार्यक्रमात सोमवारी रात्री केले. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नवीन इमारतीचे उदघाटन समारंभासाठी मंत्री मुश्रीफ हे सांगलीत आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आपण दहा वर्षे अध्यक्ष आहे. राज्याच्या मंत्रीमंडळातही अनेक वर्षे कार्यरत आहे. त्यातच मुलगा नविद मुश्रीफ हे नुकतेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष झाले आहेत. सगळीच पदे घरात नको म्हणून आपण जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले.
त्यांच्या राजीनाम्यानंतर बँकेचा अध्यक्ष कोण? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहिले तर ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील, राजेश पाटील, भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. मित्र पक्षांना संधी द्याची म्हटलीतर कॉग्रेस आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांची नावे पुढे येऊ शकतात.
मुश्रीफ सर्वाधिक काळ अध्यक्ष
हसन मुश्रीफ हे गेली ४० वर्षे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यापैकी साडे तेरा वर्षे ते बँकेचे अध्यक्ष आहेत. बँकेच्या इतका प्रदीर्घ काळ अध्यक्ष होणारे ते एकमेव आहेत.
सर्वसाधारण सभेनंतर राजीनामा ?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सभा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या सभेनंतर ते राजीनामा देणार की त्यापुर्वी देणार याबाबत उत्सुकता आहे.
यापुर्वी व्यक्त केली होती इच्छा
राज्याचे मंत्रीपदाच्या व्यापामुळे बँकेला वेळ देता येत नसल्याने तीन-चार वर्षापासून ते अध्यक्ष पद सोडण्याच्या मानसिकतेमध्ये होते. त्यांनी अनेक वेळा अशी इच्छा व्यक्त केली होती, पण त्यांची बँकेवर जबऱदस्त पकड असून तशी इतरांना ठेवता येईल का? त्यांच्या नंतर इतर नावावर एकमत होईल का? यामुळे राजीनामा थांबला होता. आता त्यांना मुलगा ‘गोकुळ’चा अध्यक्ष झाल्याचे कारण मिळाल्याने ते राजीनामा देणार आहेत.
मी मंत्री, बँकेचा अध्यक्ष, मुलगा ‘गोकुळ’चा अध्यक्ष आहे. एवढी पदे मिळाली आहेत. मंत्री असल्याने बँकेच्या कारभारात लक्ष देता येत नाही. पदाला न्याय देता येत नसल्याने बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे. यापुर्वी संचालकांना विनंती केली होती, पण त्यांनी निर्णय घेतलेला नव्हता. मात्र आता मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. - हसन मुश्रीफ (अध्यक्ष, जिल्हा बँक)