Kolhapur News: एसटी चालकास मारहाणप्रकरणी आरोपीस सक्तमजुरी
By उद्धव गोडसे | Updated: March 7, 2023 15:41 IST2023-03-07T15:41:00+5:302023-03-07T15:41:42+5:30
दुचाकीला घासून एसटी गेल्याने एसटीच्या चालकास केली होती मारहाण

Kolhapur News: एसटी चालकास मारहाणप्रकरणी आरोपीस सक्तमजुरी
कोल्हापूर : एसटी चालकास मारहाण केल्याप्रकरणी आरोपी प्रवीण जयराम शीलवंत (वय २७, रा. माळी मळा, सरनोबतवाडी, ता. करवीर) याला न्यायाधीशांनी एक वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीक्ष एस. एम. जगताप यांच्यासमोर खटल्याचे कामकाज झाले. २३ जानेवारी २०२० मध्ये कोल्हापूर-हुपरी मार्गावर उचगाव येथे दुचाकीला घासून एसटी गेल्याने शीलवंत याने एसटीच्या चालकास मारहाण केली होती.
एसटीचालक सागर सदानंद कोलते (रा. सर्वेश पार्क, फुलेवाडी) हे कोल्हापुरातून हुपरीकडे निघाले होते. उचगाव येथे एका हॉटेलसमोर एसटी दुचाकीला घासून गेली. त्यानंतर दुचाकीस्वार प्रवीण शीलवंत याने एसटी थांबवून चालक कोलते यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. याबाबत कोलते यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तपास करून संशयित शीलवंत याच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. उपलब्ध साक्षी, पुरावे आणि सरकारी वकील पी. जे. जाधव यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एस. एम. जगताप यांनी शीलवंत याला एक वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार दंडाची शिक्षा सुनावली.