पाडव्याच्या मुहूर्तावर हापूसची गोडी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 19:34 IST2021-04-13T19:17:45+5:302021-04-13T19:34:23+5:30
Gudhipadwa Mango Kolhapur : गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी हापूस आंब्याच्या मागणीत वाढ झाली. प्रत्येकाने पाडव्याला घरी गोड घेऊन जायचे म्हणून आंबा खरेदी केल्याने दरात थोडी वाढ झाली होती.

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंब्याच्या खरेदीसाठी मंगळवारी कोल्हापूरात गर्दी झाली होती. (छाया - नसीर अत्तार)
कोल्हापूर : गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी हापूस आंब्याच्या मागणीत वाढ झाली. प्रत्येकाने पाडव्याला घरी गोड घेऊन जायचे म्हणून आंबा खरेदी केल्याने दरात थोडी वाढ झाली होती.
यंदा खराब हवामानामुळे हापूस आंब्याच्या उत्पादनात घट होईल, असा अंदाज शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळेच एप्रिल मध्यावरही हापूसची आवक अपेक्षित नाही. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज सरासरी चार हजार बॉक्स ५०-६० पेटीची आवक होते. आवक कमी असल्याने दर अद्यापही तेजीतच राहिले आहेत. त्यात गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवार व मंगळवारी हापूसची मागणी वाढली आहे.
गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात हापूसचा बॉक्स सरासरी साडे पाचशे रूपयांना मिळत होता. मंगळवारी मात्र सरासरी सातशे रूपयांपर्यंत वाढ झाली होती. पेटीचा दर ही तीन हजार रूपयांपर्यंत पोहचला. किरकोळ बाजारात बॉक्सची किंमत एक हजार रूपये झाल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच चाट बसली.
बाजार समितीत मंगळवारी झालेली हापूस आंब्याची आवक
आंबा आवक दर
- हापूस ४५ पेटी १५०० ते ३०००
- हापूस ४५३० बॉक्स २०० ते १२००
- पायरी ६५ बॉक्स ३०० ते ३२०
- लालबाग ४५० बॉक्स १०० ते २५०