अशोक चव्हाणांनी लक्ष दिले असते तर नांदेडमध्ये ही परिस्थिती ओढवली नसती, मंत्री हसन मुश्रीफ यांचा निशाणा
By राजाराम लोंढे | Updated: October 6, 2023 16:25 IST2023-10-06T16:23:55+5:302023-10-06T16:25:46+5:30
कोल्हापूर : नांदेड येथील घटना दुर्दवी आहे, मात्र त्याचे राजकारण काही मंडळी करत आहेत. वास्तविक अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ...

अशोक चव्हाणांनी लक्ष दिले असते तर नांदेडमध्ये ही परिस्थिती ओढवली नसती, मंत्री हसन मुश्रीफ यांचा निशाणा
कोल्हापूर : नांदेड येथील घटना दुर्दवी आहे, मात्र त्याचे राजकारण काही मंडळी करत आहेत. वास्तविक अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, नांदेडचे आमदार आहेत. ते महिन्या, दोन महिन्यातून सरकारी रुग्णालयात गेले असते तर ही परिस्थिती ओढवली नसती, असा टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. सरकारी रुग्णालयांत क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल होतात, ही केवळ नांदेडची परिस्थिती नाहीतर संपुर्ण राज्याची असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ हे पालकमंत्री झाल्यानंतर कोल्हापूरात आले असता शुक्रवारी ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, सरकारी दवाखान्यात विषबाधा, अपघात, सर्पदंश या रुग्णांची संख्या अधिक असते. जे खासगी रुग्णालयात दाखल केले जात नाहीत, ते येतात. क्षमता नसल्याने दाखल करुन घेता येत नाही, असे रुग्णालय प्रशासनाला म्हणता येत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी बेड खाली रुग्णाला झोपवावे लागते. मात्र, येत्या महिन्याभरात सर्व रुग्णालयातील चित्र बदललेले दिसेल.
केसरकर यांचे स्वप्न पुर्ण करु
पंचवीस वर्षे आमदार आणि जवळपास २० वर्षे मंत्री असताना कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळाले नव्हते. ते मिळाल्याचा आनंद आहे. कमी दिवस आहेत, निधीची कमतरता आणि लोकांच्या अपेक्षा खूप आहेत. त्यामुळे कठाेर निर्णय घ्यावे लागतील. अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यासह नवरात्रौत्सवाबाबत माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे स्वप्न पुर्ण करु, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
मोदींना पंतप्रधान करण्यात ‘त्यांना’ अडचण
राज्याचा विकास आणि राष्ट्रवादी कार्ग्रेस पक्षाचा विस्तार, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो आहे. पण मोदी यांना पंतप्रधान करण्यात ‘त्या’ भाजप नेत्याला अडचण असेल तर माझा नाईलाज आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यांचे दुख, यातना, वेदना मी समजू शकतो, परमेश्वरच त्यांच्यावर ईलाज करु दे, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी समरजीत घाटगे यांना लगावला.