गुरुजी ‘ट्रेनिंग’ दौऱ्यावर... पोरं वाऱ्यावर...

By Admin | Updated: January 14, 2015 00:36 IST2015-01-13T20:13:46+5:302015-01-14T00:36:16+5:30

करवीरमधील शाळांची अवस्था : शिक्षक प्रशिक्षणात असल्याने एक किंवा दोन शिक्षकांवर शाळा चालतात

Guruji 'training' on touring ... on the wind ... | गुरुजी ‘ट्रेनिंग’ दौऱ्यावर... पोरं वाऱ्यावर...

गुरुजी ‘ट्रेनिंग’ दौऱ्यावर... पोरं वाऱ्यावर...

प्रकाश पाटील -कोपार्डे - करवीर तालुक्यातील प्राथमिक शाळांतील शिक्षक सध्या विविध प्रशिक्षणांतर्गत गुंतले असून, शिक्षक प्रशिक्षणात, तर विद्यार्थी वाऱ्यावर असे चित्र निर्माण झाले आहे. या प्रशिक्षणास मुख्याध्यापकांच्या तोंडी आदेशाने जावे लागत असल्याने प्रत्येक गावातील शाळेत एक किंवा दोन शिक्षकांवर पाच किंवा सात तुकड्यांचा भार पडला असल्याने शिक्षणाचा बट्याबोळ सुरू असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे.
करवीर तालुक्यातील शिक्षण विभागाच्यावतीने पहिली ते सातवीसाठीच्या प्राथमिक शिक्षकांना विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याबाबत करवीर तालुका शिक्षण विभागामार्फत केंद्र शाळांना, केंद्र शाळाकडून मुख्याध्यापकांना व मुख्याध्यापकांकडून प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी शिक्षकांना तोंडी आदेश दिले जात आहेत.
यात पहिली ते पाचवीसाठी वाचन-लेखन प्रशिक्षण, तर सातवीपर्यंतच्या शिक्षकांसाठी विषयानुसार यामध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी विषयांचे प्रशिक्षण सुरू आहे. गेले पंधरा दिवस पहिली ते सातवीच्या शाळेतील चार शिक्षक या प्रशिक्षणासाठी पाठविले जात आहेत. मात्र, यामुळे या शाळांतून गेले १५ दिवस झाले केवळ दोनच शिक्षकांवर सर्व तुकड्यांच्या शिक्षणाचे काम
सुरू आहे. याचा परिणाम शाळांत उपस्थिती असणारे शिक्षक धड कोणत्याच वर्गात शिक्षण देऊ
शकत नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून या प्रशिक्षणामुळे वंचित होत आहेत.
प्रत्येक शिक्षकाला वाचन- लेखनासाठी चार दिवस, तर विषय शिक्षकांना एक आठवड्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, पहिला शिक्षकांचा संच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता शाळेत कार्यरत असणारे शिक्षक पुन्हा प्रशिक्षणाला जाणार आहेत. यामध्ये किमान १५ दिवस ते एक महिना जाणार आहे. या प्रशिक्षित शिक्षकांतून पुन्हा ‘मास्टर ट्रेनर’ शिक्षक निवडला जाणार आहे. या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने यामुळे पालकांत संताप व्यक्त होत आहे.


इतर कामांचा बोजा
मुख्याध्यापकांना सध्या मध्यान्ह भोजनाची माहिती आॅनलाईन द्यावी लागत असल्याने येणाऱ्या धान्याचा पुरवठा व खर्च यांचा मेळ घालण्यातच त्यांचा वेळ जात असल्याने शैक्षणिक काम कमी व इतर कामाचा बोजा जास्त अशी अवस्था मुख्याध्यापकांची आहे.
यातच बी. एड्.चे प्रशिक्षण घेणाऱ्यांनाही रजा मंजूर करण्यात येत असल्याने शैक्षणिक कामकाजाचा बट्ट्याबोळ होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.


सुटीत प्रशिक्षणाची गरज
मे महिन्याच्या सुटीत प्रशिक्षण कार्यक्रम राबविला गेला तर शिक्षकांना अगदी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करता येणार आहे.
पण शैक्षणिक वर्षाच्या मध्यावधीमध्येच प्रशिक्षणाचा घाट शिक्षण विभागाने घातल्याने प्रशिक्षणासाठी गेलेले शिक्षक व एखाद्या शिक्षकाने रजा घेतल्यास केवळ एका शिक्षकावर चार किंवा सहा ते सात वर्ग चालविण्याची वेळ येत आहे.

परीक्षा तोंडावर
स्कॉलरशिप व पूर्वपरीक्षा तोंडावर असताना शिक्षण विभागाने केवळ प्रशिक्षणावर आलेला निधी खर्च करण्यासाठी हा खटाटोप सुरू केल्याची चर्चा शिक्षकांतून व्यक्त होत आहे.
केवळ तीन महिन्यांनी हे शैक्षणिक वर्ष संपणार असल्याने आता या
प्रशिक्षणातून शिक्षकांना मिळणारे ज्ञान विद्यार्थ्यांना किती देणार व त्याचा फायदा होणार काय याबद्दलही शंका व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Guruji 'training' on touring ... on the wind ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.