चार्ली चॅप्लिनला अभिवादन
By Admin | Updated: December 23, 2015 01:26 IST2015-12-23T00:41:25+5:302015-12-23T01:26:51+5:30
कोल्हापूर चित्रपट महोत्सव : रिचर्ड अॅटेनबरो दिग्दर्शित ‘चॅप्लिन’ची रसिकांवर मोहिनी

चार्ली चॅप्लिनला अभिवादन
कोल्हापूर : चित्रमहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे आयोजित चौथा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सुरू आहे. मंगळवारी बारा चित्रपट आणि पाच लघुपट दाखविण्यात आले. दिग्दर्शक रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित ‘चॅप्लिन’ हा चार्ली चॅप्लिनच्या जीवनावरील चित्रपट मंगळवारचे आकर्षण ठरला.
यंदाचे वर्ष कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि चार्ली चॅप्लिन यांचे १२५ वे जयंती वर्ष आहे; तर चित्रमहर्षी आनंदराव पेंटर यांचे स्मृतिशताब्दी वर्ष आहे. या तीन व्यक्तींना हा महोत्सव अभिवादित करण्यात येत आहे.
शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या नायकाला दूरदर्शन मालिकेत महात्मा गांधीजींची भूमिका करायची संधी मिळते. ही भूमिका करीत असताना तो गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाशी समरस होतो. याची कहाणी म्हणजे महोत्सवात गौरविलेले दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांचा ‘कूर्मावतार’ हा चित्रपट. बालपणी झालेले लैंगिक शोषण अन् पालकांनी तिच्या सांगण्याकडे केलेले दुर्लक्ष, तिच्या वेदना जाणून घेणारे कोणी नसल्याने वय वाढेल तसे तिचे मन दगडाचे बनत जाते. समाजातील अशा एका खुलेपणाने न बोलल्या जाणाऱ्या समस्येवर दिग्दर्शिका पौराण देराक्शंदेहने ‘हुश्श ! गर्ल्स डोंट स्क्रीम’ या चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
एका निरपराधी शिक्षकाला माओवादी असल्याच्या समजुतीने सैनिक कत्तलखान्यात डांबून ठेवतात. वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेऊन ही कथा नेपाळचे दिग्दर्शक मनोज पंडित यांनी ‘बधशाला’ या चित्रपटातून गुंफली आहे.
भारतीय संस्कृतीशी निगडित माहितीपटाची निर्मिती करण्यासाठी लंडनमधील दोन भारतीय भारतातील विधींची माहिती घेण्यासाठी येथे येतात. त्यांचा हा प्रवास म्हणजे प्रशांत पाटील दिग्दर्शित सिनेमा ‘पिंडदान.’ एका गावामध्ये राहणारा अल्पवयीन नायक व तरुणी यांच्यात मैत्रीकडे गेलेले, न कळण्याइतके नाते व त्यातून नायकाच्या मनातील संभ्रम, त्यादरम्यान त्याच्यावर ओढवलेली परिस्थिती, अंगावर पडलेली जबाबदारी असे कथानक दिग्दर्शक मयूर करंबळीकर यांनी ‘साकव’ या चित्रपटातून मांडले आहे.
दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या चित्रकलाकुसरीचा उत्तम नमुना म्हणजे ‘मिस्टर अॅँड मिसेस ५५.’ गुरुदत्त यांच्या लयबद्ध आणि काव्यात्म शैलीचा प्रारंभ या चित्रपटात प्रकर्षाने दिसतो. प्रीतम या व्यंगचित्रकार नायकाची कथा सांगणारा हा चित्रपट मार्मिक भाष्य करतो. प्रसन्न व खेळकर शैलीत सादर केलेल्या या चित्रपटात गुरुदत्तनी समाजाशी झगडा करणारी व्यक्तिरेखा रंगविली आहे.
स्वीडनचे दिग्दर्शक एक्सेल पीटरसन यांचा ‘अॅवालॉन,’ फिलिपाईन्सचे दिग्दर्शक जेफरी जेट्युरीयन यांचा ‘द बेट कलेक्टर,’ इटालियन दिग्दर्शक गुसेपी टोरनॅटोर यांचा ‘अ प्युअर फॉरमॅलिटी,’ गिरीश कासारवल्ली यांचा ‘घटश्राद्ध,’ तसेच किस्सा ए पार्सी, एक होता काऊ, थ्री डॉट्स, प्लेइंग द टार, वुई कम फ्रॉम फार अवे हे लघुपट दाखविण्यात आले. ( प्रतिनिधी )
४स्क्रीन नं. १ : सकाळी १० वाजता- द किड्स फ्र ॉम मार्स अॅँड इगल्व स्ट्रीट (मॉँटेनिग्रा), दुपारी १२ वाजता - द बेस्ट आॅँफर (इटली), दुपारी २.३० वाजता - टुरिस्ट (स्वीडन), सायंकाळी ६.३० - कोती (मराठी), रात्री ९ वाजता - अवॅलॉन (स्वीडन).
४स्क्रीन नं. २ : सकाळी १० वाजता - वॉरियर्स आॅफ स्टेफी (कझाकिस्तान), दुपारी २.३० वाजता- सिनेमा पॅराडिसो (इटली), सायंकाळी ६.३० वाजता- द अटॅक (इस्राईल), रात्री ९ वाजता - श्री ४२० (हिंदी).
४स्क्रीन नं. ३ : सकाळी ९.३० वाजता - बधशाला (नेपाळ), दुपारी १२ वाजता - ताई साहेबा (कन्नड), दुपारी २.३० वाजता - कुर्मावतारा (कन्नड).