मदतीच्या प्रतीक्षेत द्राक्ष बागायतदार
By Admin | Updated: December 4, 2014 23:34 IST2014-12-04T22:15:39+5:302014-12-04T23:34:52+5:30
हवामानासंबंधी ठोस माहिती गरजेची

मदतीच्या प्रतीक्षेत द्राक्ष बागायतदार
संदीप बावचे -जयसिंगपूर -अवकाळीच्या तडाख्याने नुकसान झालेल्या शिरोळ तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीच्या तडाख्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांमुळे नुकसान भरपाई मिळाली नव्हती. यामुळे द्राक्ष बागातदारांना तरी नुकसान भरपाई मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवकाळी आणि ढगाळ हवामानामुळे गणेशवाडी, निमशिरगाव, शेडशाळ, दानोळी, टाकळी, नांदणी, जैनापूर, आदी गावांतील द्राक्ष बागायतदार हवालदील झाले होते. सुमारे आठशे एकर द्राक्षबागा या परिसरात आहेत. बदलत्या हवामानामुळे द्राक्षकूज, मणीगळ, दावणी, आदी रोगांचा प्रादुर्भाव खास करून जाणवला होता. अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे या पिकाला जणू ग्रहणच लागले. शेतकरी भयभीत झाला. सतत पावसाच्या होणाऱ्या माऱ्यामुळे द्राक्ष घड कुजण्याच्या, तर पाणी साठल्यामुळे द्राक्ष मणी गळण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
अस्मानी संकटानंतरही शेतकऱ्यांनी औषध फवारणी करून हे पीक वाचविण्याचा प्रयत्न केला. एकूणच उत्पादनाचा महागडा खर्च, औषध फवारणीत येणारा व्यत्यय, मजुरांचा तुटवडा व हवामानाच्या न येणाऱ्या अंदाजामुळे द्राक्ष बागयतदारांचे कंबरडे मोडल्याची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, कायम स्वरूपी संरक्षण देऊन द्राक्ष पिकांना आधारभूत किंमत शासनाने ठरवावी, अशी मागणी द्राक्ष बागायतदारांतून होत आहे.
हवामानासंबंधी ठोस माहिती गरजेची
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागायतदारांना यापूर्वी हेक्टरी १२ हजार रुपये नुकसान भरपाई मिळत होती. द्राक्ष पिकासाठी येणारा औषधांचा खर्च पाहता शासनाकडून मिळणारी ही मदत तुटपुंजीच ठरणार आहे. वास्तविक भूगोल शास्त्रानुसार ग्लोबल वार्मिंगचे काम करणाऱ्या यंत्रणेकडून वातावरणातील हवामानाची ठोस माहिती उपलब्ध होणे गरजेचे आहे. तरच द्राक्ष बागायतदारांना पिकांचे नियोजन करणे सोयीचे ठरणार आहे.