ग्रामपंचायतींमध्येही अभियंते!
By Admin | Updated: August 9, 2014 00:35 IST2014-08-08T23:06:30+5:302014-08-09T00:35:41+5:30
तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अभियंत्यांची नियुक्ती

ग्रामपंचायतींमध्येही अभियंते!
रहिम दलाल - रत्नागिरी -- स्थानिक विकासाचे केंद्र म्हणून ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील २१ ग्रामपंचायती विकसित करण्यासाठी व त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात ग्रामपंचायत क्षेत्रात होणाऱ्या विकासकामांना चांगला दर्जा प्राप्त होणार असल्याचे संकेत आहेत.
ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची अंदाजपत्रके तयार करणे, कामाचे मूल्यांकन करणे आदी कामे पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर करण्यात येतात. यामध्ये बराच कालावधी जात असल्याने विकासकामे होण्यास फार उशिर होतो. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरच विकासकामांची अंदाजपत्रके तयार करून मूल्यांकन करण्यात येणार असल्याने कामे अधिक सुलभ व गतीने होतील, असा शासनाला विश्वास आहे.
राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंत्राटी पध्दतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायतीकडून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांसाठी हे अभियंते तांत्रिक सल्ल्यासह कामांची अंदाजपत्रके तयार करणार आहेत. त्याचबरोबर त्या कामांची निविदा प्रक्रिया राबवून काम पूर्ण होईपर्यंत देखरेख करणे तसेच कामाच्या मूल्यांकनासह पूर्णत्त्वाचा दाखलाही हे अभियंते देणार आहेत.
५००० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये हे अभियंते नियुक्त करण्यात येणार आहेत. या अभियंत्यांच्या नियुक्त्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत.
ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात येणाऱ्या अभियंत्यांमुळे लवकर विकासकामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकामासाठी व इतर प्रस्तावांची तांत्रिक छाननी करणे, कामांची अंदाजपत्रके, निविदा प्रक्रिया करणे, वेळप्रसंगी कामांवर देखरेख करणे, मोजमाप व मूल्यांकन करणे आदी जबाबदाऱ्या या अभियंत्यांना पार पाडाव्या लागणार आहेत.ग्रामपंचायतींत अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याने गावच्या विकासाला चालना मिळणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये त्या गावची प्रत्यक्ष पाहणी करुन या अंभियत्याला विकास आराखडा तयार करण्यास सोयीचे जाणार आहे. त्यामुळे योग्य प्रकारे गावचा विकास साधला जाणार आहे.
तालुकाग्रामपंचायत
रत्नागिरीपावस, करबुडे, नाचणे,
कुवारबाव, गोळप,
मिरजोळे, शिरगाव.
दापोलीबुरोंडी, गिम्हवणे,
दाभोळ, हर्णै, जालगांव.
खेडभरणे.
चिपळूणपोफळी बुद्रुक, सावर्डे,
गुहागरपाटपन्हाळे, पालशेत.
खेर्डी.
संगमेश्वरकडवई, नावडी.
राजापूर सागवे