ग्रामपंचायत निवडणुका मुदतीतच
By Admin | Updated: June 28, 2015 23:18 IST2015-06-28T23:18:51+5:302015-06-28T23:18:51+5:30
जे. एस. सहारिया : पुढे ढकलणे अशक्य; जिथे शक्य आहे, तिथे तारखांत बदल

ग्रामपंचायत निवडणुका मुदतीतच
कोल्हापूर : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम तयार करताना आषाढी वारीचा विचार केला होता; पण काही जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचे नवीन सदस्य मंडळ मुदतीत अस्तित्वात येणे गरजेचे असल्याने तारखांमध्ये बदल करता आला नसल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मात्र, जिथे शक्य आहे, तिथे ४ आॅगस्टनंतर मतदान ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात २५ जुलैला ११ जिल्ह्यांतील १७७९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे, तर ६३२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. दुसऱ्या टप्प्यात ४ आॅगस्टला २३ जिल्ह्यात ७०१९ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत असून, १२१२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर ५७ ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत. ही निवडणूक ऐन आषाढी वारीमध्येच येत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानही वारीतील मुख्य वाखरी येथील रिंगण सोहळ्यादिवशीच ठेवले आहे. राज्यातून लाखो भाविक वारीसाठी तीन आठवडे पंढरपूरच्या मार्गावर असतात. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम होणार असल्याने मतदानाची तारीख २५ ऐवजी २९ जुलै करावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी निवडणूक कार्यालयाकडे केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाची भूमिका नेमकी काय आहे, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, राज्यातील पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करताना आषाढी वारीबाबत विचारविनिमय झाला; पण मुदत संपण्यापूर्वी नवीन सदस्य मंडळ अस्तित्वात येणे बंधनकारक असल्याने तत्पूर्वीच निवडणुका घेणे गरजेचे होते. त्यामुळे जिथे शक्य होते, त्या ठिकाणी ४ आॅगस्टला मतदान ठेवले असल्याचे जे. एस. सहारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दृष्टिक्षेपात ग्रामपंचायत निवडणुका
पहिला टप्पा : २५ जुलैला मतदान
जिल्ह्यांची संख्यासार्वत्रिक निवडणुकापोटनिवडणुका होत
लागलेल्या ग्रामपंचायतीअसलेल्या ग्रामपंचायती
११ १७७९ ६३२
दुसरा टप्पा : ४ आॅगस्टला मतदान
२३ ७०१९ १२१२