रेशनवरील हरभरा आणि उडीद डाळ महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 08:50 AM2019-01-11T08:50:24+5:302019-01-11T14:27:30+5:30

रेशनवरील हरभरा व उडीदडाळ महागली आहे. पुढील महिन्यापासून हरभराडाळ प्रति किलो ४० व उडीदडाळ ५५ रुपये या वाढीव दराने विकली जाईल.

Gram and uradi dal will be expensive on ration | रेशनवरील हरभरा आणि उडीद डाळ महागणार

रेशनवरील हरभरा आणि उडीद डाळ महागणार

Next

प्रवीण देसाई

कोल्हापूर : रेशनवरील हरभरा व उडीदडाळ महागली आहे. पुढील महिन्यापासून हरभराडाळ प्रति किलो ४० व उडीदडाळ ५५ रुपये या वाढीव दराने विकली जाईल. जिल्ह्यासाठी दोन्ही मिळून ११०० टन डाळींची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त सरकारने रेशनवर प्रतिकिलो ३५ दराने हरभराडाळ व ४४ रुपयांनी उडीदडाळ देण्याची घोषणा केली होती; परंतु हे दर सर्वसामान्यांना परवडणार नसल्याने दुकानदारांनी ती न उचलण्याचा पवित्रा घेतला होता; परंतु सरकारने दिवाळीच्या सणासुदीच्या काळात ही डाळ उपलब्ध करून दिली नाही.

त्यामुळे या डाळीविनाच ग्राहकांना दिवाळी साजरी करावी लागली. त्यानंतर ही डाळ रेशनवर यायला सुरुवात झाली; परंतु ती पुरेशा प्रमाणात नसल्याने दुकानदारांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यातच आता शासनाने या डाळींचे दर वाढविले असून, हरभराडाळीचा दर ४० रुपये व उडीदडाळीचा दर ५५ रुपये केला आहे. या वाढीव दराने पुढील महिन्यापासून विक्री करण्यात येणार आहे.


खुल्या बाजारात हरभरा डाळीचा दर प्रतिकिलो जवळपास ८० रुपये व उडीद डाळीचा दर ९० रुपयांच्या आसपास आहे. या दराने डाळ घेणे सर्वसामान्य ग्राहकांना एक दिव्यच होऊन बसले आहे. त्यातच रेशनवर डाळ उपलब्ध करून दिल्याने थोडासा दिलासा मिळाला होता; परंतु त्याचे दर वाढल्याने ग्राहकांना झळ बसणार असल्याने त्यांच्या रोषाला रेशन दुकानदारांसह पुरवठा विभागालाही येणाऱ्या काळात सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

साडेपाच लाख कुटुंबांना मिळणार डाळ

जिल्हा पुरवठा विभागाकडून शासनाकडे हरभराडाळ ५५० टन व उडीदडाळ ५५० टन असे ११०० टन डाळींची मागणी केली आहे. मागणीप्रमाणे डाळ शासकीय गोदामांमध्ये यायला सुरुवातही झाली आहे. महिनाअखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने ती येणार आहे. अंत्योदय ५१ हजार व प्राधान्य ४ लाख ९९ हजार रेशन कार्डधारक कुटुंबांना एक किलोप्रमाणे ही डाळ दिली जाईल.
 

रेशनवरील हरभरा व उडीदडाळींचा दर वाढला असला तरी तो खुल्या बाजारातील डाळींपेक्षा कमी आहे. तसेच रेशनवरील डाळ ही उत्तम प्रतीची व दर्जेदार असून ती एक किलोच्या पॅकेटमध्ये सीलबंद केलेली आहे. शासकीय गोदामात डाळ यायला सुरुवात झाली असून, पुढील महिन्यापासून वाढीव दराने तिची विक्री होईल.
- अमित माळी,
जिल्हा पुरवठा अधिकारी

 

हरभराडाळ व उडीदडाळ सध्या रेशनवर पूर्ण क्षमतेने येत नाहीत; त्यामुळे ग्राहकांचा दुकानदारांवर रोष आहे. त्यातच सरकारने डाळींचे दर वाढवून या रोषात भर पाडली आहे. यामुळे दुकानदारांची अडचण झाली असून, त्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. ही वाढ निषेधार्ह आहे. ती त्वरित मागे घ्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
- चंद्रकांत यादव,
अध्यक्ष, रेशन बचाव समिती
 

Web Title: Gram and uradi dal will be expensive on ration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.