आरोग्य विभागाच्या वाहनांना जीपीएस

By Admin | Updated: April 7, 2015 01:19 IST2015-04-07T00:18:28+5:302015-04-07T01:19:12+5:30

महापालिकेचा निर्णय : वाहनांच्या वापराची माहिती मोबाईलवर

GPS to health department vehicles | आरोग्य विभागाच्या वाहनांना जीपीएस

आरोग्य विभागाच्या वाहनांना जीपीएस

मिरज : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. जीपीएसमुळे ठरलेला मार्ग सोडून इतरत्र फिरणाऱ्या महापालिकेच्या वाहनांवर आता नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. आरोग्य विभागाचे कचरा उचलणारे ट्रक, ट्रॅक्टर, कॉम्पॅक्टर आदी ५७ पैकी ५० वाहने जीपीएस यंत्रणेला जोडण्यात आली असून दोन दिवसात ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील वाहने वेळेवर कचरा उचलत नाहीत. ठरलेल्या भागाऐवजी भलत्याच ठिकाणी फिरत असतात. वाहने न फिरता जागेवरच थांबून असतात. वाहनांसाठी लागणाऱ्या डिझेलचा अपहार होतो, अशा अनेक तक्रारी आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून वाहनांच्या डिझेल टाक्यांना सील करण्यासह अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र या उपाययोजना फारशा परिणामकारक ठरलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आरोग्य विभागाकडील वाहनांच्या दैनंदिन वापराकडे लक्ष ठेवण्यासाठी ग्लोबल पोझीशनिंग सिस्टम या यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
सुमारे पाच लाख रूपये खर्चून वाहने या जीपीएस यंत्रणेला जोडण्यात आली आहेत. ही यंत्रणा दोन दिवसात कार्यान्वित होणार असून, वाहने दररोज कोठे जातात, कोठे किती वेळ थांबतात, किती किलोमीटर फिरतात, हे आयुक्त, उपायुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांना मोबाईलवर समजणार आहे.
वाहनातील जीपीएस यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याची जबाबदारी चालकाची असून, यंत्रणा बंद पडल्यास चालकावर कारवाई करण्यात येणार आहे. जीपीएस यंत्रणेमुळे महापालिकेच्या वाहनांचा गैरवापर बंद होणार असून वाहनांचा साफसफाई व आरोग्य विभागाच्या कामासाठी अचूक वापर होणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)

दोन दिवसात यंत्रणा कार्यान्वित
सुमारे पाच लाख रूपये खर्चून आरोग्य विभागाची वाहने जीपीएस यंत्रणेला जोडण्यात आली आहेत. ही यंत्रणा दोन दिवसात कार्यान्वित होणार आहे. जीपीएस यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याची जबाबदारी चालकाची असून, यंत्रणा बंद पडल्यास चालकावर कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: GPS to health department vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.