Govind Pansare Murder Case: पानसरे दाम्पत्याची रक्ताच्या डागाची कपडे साक्षीदारांनी ओळखली

By उद्धव गोडसे | Published: March 21, 2023 05:58 PM2023-03-21T17:58:08+5:302023-03-21T18:31:37+5:30

संशयित आरोपींचे वकील समीर पटवर्धन, वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अमोघवर्ष खेमलापुरे यांनी साक्षीदारांची उलटतपासणी घेतली

Govind Pansare Murder Case: Blood stained clothes of Pansare couple identified by witnesses | Govind Pansare Murder Case: पानसरे दाम्पत्याची रक्ताच्या डागाची कपडे साक्षीदारांनी ओळखली

छाया - आदित्य वेल्हाळ

googlenewsNext

कोल्हापूर : कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यात आज, मंगळवारी (दि. २१) जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर दोन साक्षीदारांच्या साक्षी आणि त्यांची उलटतपासणी झाली. दोन्ही साक्षीदारांनी पानसरे दाम्पत्याची रक्ताच्या डागाने माखलेली कपडे न्यायालयात ओळखली. पुढील सुनावणी तीन एप्रिलला होणार आहे.

पानसरे खून खटल्यातील साक्षीदारांच्या साक्षी आणि त्यांच्या उलटतपासणीला मंगळवारपासून सुरुवात झाली. पानसरे दाम्पत्यावर हल्ला झाल्यानंतर आधार ॲस्टर हॉस्पिटलमध्ये जखमींचे कपडे जप्त करण्यात आले. त्यावेळचे पंच इम्तियाज नूरमहम्मद हकीम (वय ४७, रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा, कोल्हापूर) आणि सादिक सिराज मुल्ला (४२, रा. सुभाषनगर, सिरत मोहल्ला, कोल्हापूर) या दोघांची साक्ष विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी घेतली. यावेळी न्यायालयात दाखविण्यात आलेली पानसरे दाम्पत्याची रक्ताच्या डागाने माखलेली कपडे ओळखत असल्याचे दोन्ही साक्षीदारांनी सांगितले. तसेच ॲड. निंबाळकर यांनी विचारलेल्या प्रश्नांनुसार साक्षीदारांनी पंचनाम्याचा घटनाक्रमही सांगितला.

संशयित आरोपींचे वकील समीर पटवर्धन, वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अमोघवर्ष खेमलापुरे यांनी साक्षीदारांची उलटतपासणी घेतली. नावापासून ते पंचनाम्यातील बारकाव्यांपर्यंत अनेक जटील प्रश्न विचारून त्यांनी साक्षीदारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दुपारी बाराच्या सुमारास सुरू झालेली हकीम यांची साक्ष आणि उलटतपासणी पावणेदोनला संपली, तर दुपारनंतरच्या सत्रात तीनला सुरू झालेली मुल्ला यांची साक्ष आणि उलटतपासणी पावणेपाचला पूर्ण झाली.

सरकार पक्षामार्फत विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी कामकाज पाहिले. सुनावणीसाठी गुन्ह्यातील सर्व बारा संशयित आरोपींना मोठ्या पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. पुढील सुनावणी तीन एप्रिलला होणार आहे.

Web Title: Govind Pansare Murder Case: Blood stained clothes of Pansare couple identified by witnesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.