धार्मिक भावनांना आवर घालून शासनास सहकार्य हवे

By Admin | Updated: May 12, 2015 23:39 IST2015-05-12T23:26:58+5:302015-05-12T23:39:53+5:30

वसंत शेटके यांचे मत

The government should cooperate with religious sentiments | धार्मिक भावनांना आवर घालून शासनास सहकार्य हवे

धार्मिक भावनांना आवर घालून शासनास सहकार्य हवे

तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे झालेल्या फटाक्यांच्या स्फोटामुळे फटाके निर्मिती आणि जबाबदारी हा विषय चर्चेत आला आहे. कवठेएकंद गावाला दसऱ्यादिवशी फटाक्यांच्या आतषबाजीची परंपरा असली तरीही, फटाके निर्मिती करताना योग्य ती काळजी घेण्यात येत नसल्याचेच निदर्शनास आले आहे. काही वर्षांनंतर जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन जीवितहानी होण्याच्या घटना वारंवार का घडतात, त्या थांबण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात आदी विषयांवर मनपाचे निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी वसंत शेटके यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...
कवठेएकंदसारख्या दुर्घटनांची जिल्ह्यात पुनरावृत्ती का होते?
- नेमकी दुर्घटना कोणत्या कारणांमुळे होते, याच्या मुळापर्यंत जोपर्यंत आपण जात नाही, तोपर्यंत ‘या’ प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. जेव्हा स्फोटासारखी दुर्घटना होते, तेव्हा प्रशासन चौकशी समिती नेमते. परंतु यातून काहीच निष्पन्न होत नाही. भविष्यात दुर्घटना घडू नये यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना प्रशासनामार्फत करण्यात येत नाही. काही काळानंतर नागरिक सर्वच विसरुन जातात व पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’चाच अनुभव येतो. याला सर्वस्वी मनुष्यस्वभावच जबाबदार आहे. आग लागल्यावर ती विझविण्यापेक्षा, ती लागू नये यासाठी जोपर्यंत प्रयत्न करण्यात येत नाहीत, तोपर्यंत दुर्घटना थांबतील या भ्रमात राहण्यात काहीच अर्थ नाही.
परंतु प्रशासन तर सक्षम असल्याचे बोलले जाते...
- दुर्घटना घडल्यावर सक्षमपणा उपयोगाचा नाही. फटाक्यांचे कारखाने, विक्रेते आदींना प्रशासनामार्फत जो परवाना देण्यात येतो, त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची तपासणी करण्यात येते का, हे पाहिले पाहिजे. एकदा ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले की प्रशासनाचे काम संपत नाही. वर्षभरात केव्हाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारखाने, विक्रेते यांच्या इमारतींची तपासणी केली पाहिजे. नियमापेक्षा तेथे जास्त मालाची साठवणूक तर होत नाही ना आणि जर कोणी दोषी आढळले, तर त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला पाहिजे. तरच प्रशासनाचा वचक बसेल.
फटाके निर्मिती कारखान्यात कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे?
- जेथे फटाके निर्मितीचा कारखाना असेल, तेथे उत्पादित माल ठेवण्यासाठी एकाच मोठ्या खोली ऐवजी तेथे विविध खोल्या असल्या पाहिजेत. जेणेकरुन समजा आग लागलीच, तर सर्वच स्फोटक सामग्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडणार नाही. इमारत ही विटा अथवा मातीपासून निर्मित असावी. तेथे काम करणाऱ्या कामगारांना, संभाव्य दुर्घटना घडली तर घाबरुन न जाता काय करावे, याची माहिती देणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे इमारतीत विजेचे कनेक्शन नसावे. त्याऐवजी ट्रॉली माउंटेड लाईट प्रकाराचा वापर करावा. इमारत तापू नये यासाठी इमारतीसाठी सूर्यकिरण परावर्तित होतील, अशा प्रकारच्या रंगाचा वापर आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इमारतीत तापमान मापक यंत्र देखील बंधनकारक आहे. कारखान्याच्या इमारतीत ‘स्प्रिंकलर’ पध्दतीचा (कारंजाप्रमाणे उडणारे पाणी) वापर करावा. म्हणजे
दुर्घटना घडल्यास इमारतीच्या बाहेरील बाजूस असणारे नळ कनेक्शन सुरु केल्यास आतील बाजूस पाणी कारंजासारखे उडेल व आग विझविण्यास साहाय्य होईल. निदान इतकी तरी खबरदारी घेतली पाहिजे. कवठेएकंद येथे झालेल्या दुर्घटनाग्रस्त कारखान्यात यातील किती बाबींची अंमलबजावणी करण्यात आली होती, याचा अभ्यास केला पाहिजे.
कवठेएकंदला दसऱ्याची परंपरा असल्याने तेथे अनेक ठिकाणी अपुऱ्या जागेत फटाके निर्मिती होते. त्यामुळे याची अंमलबजावणी कितपत होईल ?
- सुरक्षेसाठी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. शेकडो वर्षांपासून कवठेएकंदला फटाक्यांची निर्मिती होत आहे. परंतु तेव्हा कधी अशी दुर्घटना झाल्याचे दिसून येत नाही. कारण तेव्हा एक परंपरा म्हणून फटाक्यांची निर्मिती होत होती. सध्या या व्यवसायात स्पर्धा आली आहे. परिणामी प्रत्येक फटाके व्यावसायिक अधिकाधिक प्रमाणात फटाक्यांची तीव्रता वाढवत नेत आहेत. घरटी होणारे फटाक्यांचे उत्पादन तात्काळ बंद करावे. फटाके निर्मिती करणारे कारखाने गावाच्या बाहेर स्थलांतरित करुन, त्यामध्ये शंभर फुटाचे अंतर ठेवणे गरजेचे आहे. धार्मिक भावनांना आवर घालून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे.
शहरात दिवाळीच्या कालावधित अनेक फटाके स्टॉल एकाच छताखाली आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असतो...
- हा उपक्रम चांगला असला तरी, फटाके स्टॉल बंदिस्त नव्हे, तर खुल्या क्रीडांगणावर एकत्रित उभे करावेत. प्रत्येक स्टॉलला सर्व बाजूंनी पत्रे लावणे आवश्यक आहे. शिवाय तेथे पुरेशा प्रमाणात पाण्याच्या टाक्या व बादल्या ठेवणे गरजेचे आहे.
अग्निशमन कर्मचाऱ्यांची आग विझविण्यात काय भूमिका असते ?
- काही नाही! फटाक्यांची दुर्घटना ही क्षणार्धात घडते. त्यामुळे अग्निशमन दल तेथे पोहोचेपर्यंत सर्व आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले असते. मातीचे ढिगारे उपसणे, एवढेच काम शिल्लक राहते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अग्निशमन दल कर्मचाऱ्यांना स्फोटकांना लागलेली आग विझविण्याचे प्रशिक्षणच देण्यात येत नाही. त्यामुळे आगीबाबत संबंधितांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा अशा दुर्घटना रोखणे अशक्य आहे.
४नरेंद्र रानडे

Web Title: The government should cooperate with religious sentiments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.