लोकमत न्यूज नेटवर्क, इचलकरंजी : किंग्ज क्लब, लकी स्टार यासारख्या ऑनलाईन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सुरू असलेल्या कॅनिसो जुगारामुळे अनेकजण देशोधडीला लागले. याविरोधात येथील संतोष कोळी ऊर्फ बाळ महाराज यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. त्यामध्ये केंद्र व राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.
विविध नावाने सुरू असलेल्या गेम व ऑनलाईन कसीनोच्या नावाखाली जुगार चालविला जात आहे. त्यामुळे अनेक तरुण देशोधडीला लागले. जुगारींची लूट होवून त्यांना आपली मालमत्ता विकावी लागली. काहीजणांनी आत्महत्या केली. त्यामुळे या प्रकारास जबाबदार असणाऱ्या बड्या धेंड्यांचा पर्दाफाश करून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी या रॅकेटच्या मुळाशी न जाता जुजबी कारवाई केली. परिणामी हा जुगार राजरोसपणे सुरूच राहून जुगारींची फसवणूक होत आहे. यामध्ये सामील असलेल्या मालक, सॉफ्टवेअर विकसित करणारे घटक, त्यात फेरफार करणारी व्यक्ती, ही यंत्रणा कुठून कार्यान्वित होते, याबाबत तपास होणे आवश्यक असल्याचे मत कोळी यांनी आपल्या याचिकेत दाखल केले होते. त्यानुसार प्रतिवादी म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकार, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय, जुगाराचे डिलर इंदरचंद अग्रवाल, अमेय बडवे, तरुण अग्रवाल, आदींना प्रतिवादीत करण्यात आले आहे. याची दखल घेत न्यायाधीश माधव जामदार व न्यायाधीश ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी १२ फेब्रुवारीला होणार आहे.