गोपाळराव काँग्रेसचा झेंडा पुन्हा हातात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST2021-02-05T07:08:42+5:302021-02-05T07:08:42+5:30

(गोपाळराव पाटील यांचा फोटो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील भाजपचे नेते गोपाळराव पाटील हे त्या पक्षाला ...

Gopalrao will take the Congress flag in his hand again | गोपाळराव काँग्रेसचा झेंडा पुन्हा हातात घेणार

गोपाळराव काँग्रेसचा झेंडा पुन्हा हातात घेणार

(गोपाळराव पाटील यांचा फोटो वापरावा)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील भाजपचे नेते गोपाळराव पाटील हे त्या पक्षाला राजीनामा देणार असल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघातील (गोकुळ) किंवा जिल्हा बँकेतील सत्तेचा वाटा त्यांना खुणावत असल्याने अगोदरच फज्जा शिवलेला बरा म्हणून त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील व गोपाळराव हे जुने गट त्यानिमित्ताने एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे मानण्यात येते.

चंदगड तालुक्याच्या राजकारणात एकेकाळी गोपाळराव पाटील यांचा प्रबळ गट होता. त्यांनी विधानसभा निवडणुकीतही दोनवेळा धडक दिली. परंतु, यश मिळाले नाही. आजही त्यांच्याकडे किमान २५ हजार मतांचा गट आहे. सामान्य कार्यकर्त्यांत त्यांच्याबद्दल ओढ आहे. परंतु, हातात कोणतीच सत्ता नसल्याने त्यांची राजकारणात पीछेहाट आणि कोंडीही झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळेल म्हणून त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला. हा मतदारसंघ युतीच्या वाटणीत शिवसेनेच्या वाट्याला जाणार हे भाजपला उमगले नाही. त्यामुळे या सर्वांना अपक्ष उमेदवाराचा प्रचार करण्याची पाळी आली. पुढे राज्याच्या सत्तेतूनही भाजप हद्दपार झाला. राज्यातील सरकारमध्ये काही गडबड होईल, अशीही स्थिती नाही. त्यामुळे पुन्हा पाच वर्षे भाजपसोबत विरोधात राहण्याची गोपाळराव यांची मानसिकता नाही. त्यामुळेच भाजपला रामराम करून काँग्रेसचा झेंडा ते पुन्हा हातात घेतील, असे चित्र दिसते.

पालकमंत्री सतेज पाटील हेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांना पक्षाचे संघटन बळकट करायचे आहे. काँग्रेसमध्ये सध्या ओमसाई आघाडीचे संभाजीराव देसाई हे काँग्रेसचे काम करत आहेत. गोपाळराव पाटील यांच्यासारखा नेता काँग्रेसमध्ये आल्यास पक्षालाही आगामी निवडणुकीत चांगले यश मिळू शकते. जिल्ह्यात गोकुळ व जिल्हा बँक ही महत्त्वाची सत्तास्थाने आहेत. आमदार राजेश पाटील व दीपक भरमू पाटील हे गोकुळचे संचालक आहेत. आमदार पाटील हे पालकमंत्री पाटील यांच्यासोबत राहतील, त्यामुळे गोकुळमध्ये संधी मिळाली नाही तरी गोपाळराव हे जिल्हा बँकेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार ठरू शकतात.

Web Title: Gopalrao will take the Congress flag in his hand again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.