तूपकरांनी आठवड्यात सत्तर सभा गाजविल्या
By Admin | Updated: October 19, 2015 23:51 IST2015-10-19T23:29:35+5:302015-10-19T23:51:29+5:30
शेतकऱ्यांना दिली ऐक्याची हाक : संघटनेला मिळालेली लाल दिव्याची गाडी मेळाव्यात

तूपकरांनी आठवड्यात सत्तर सभा गाजविल्या
आयुब मुल्ला - खोची--ऊस दराच्या मोर्चासाठी नामदार रविकांत तूपकर यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, करवीर तालुक्यांतील व सातारा परिसरातील ७० गावांत फक्त आठ दिवसांत प्रबोधनात्मक सभा घेतल्या.
३१ वर्षांच्या या तरुण चेहऱ्याने खणखणीत भाषणातून शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना घामाच्या दामाच्या हक्काच्या लढाईसाठी सामील व्हा, असा आवाज दिला. त्यांच्या वाणीतून वास्तववादी मुद्दे समोर आले. त्यांचे विविध संदर्भ तर जागे करणारे होते. त्यामुळे संघटनेचा हा तरुण वक्ता सभेला गर्दी खेचताना दिसला. सभा जिंकल्या आणि लोकही त्यांच्या प्रेमात पडले. कापूस, सोयाबीनसाठी विदर्भात आंदोलन करणारा हा नेता उसासाठी सक्रीय झाला.
‘एफआरपी’ची एकरकमीने उचल मिळावी, यासाठी शुक्रवारी कोल्हापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विराट मोर्चा काढला. याच्या पूर्वतयारीसाठी खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी विविध भागांत स्वतंत्र सभा, बैठका घेतल्या. त्यामुळे वातावरण निर्मिती झाली. परंतु, रविकांत तूपकर यांच्या रूपाने सभेसाठी लाल दिव्याची गाडी फिरली. गावागावांतील शेतकऱ्यांनी या गाडीचे उत्सुकतेने स्वागत केले. कारण संघटनेला मिळालेला हा पहिलाच लाल दिवा. त्यांनी अस्सल रांगड्या व वैविध्यपूर्ण शैलीने गावागावांतील सभा जिंकल्या. तरुणांसमोर त्यांच्या भाषणाने एक आशादायक चित्र निर्माण केले. त्यांच्या वास्तववादी इतिहासातील संदर्भाने सभेत रंगत आणलीच अन् संवेदनशीलताही उभी केली. त्यांच्या भाषणातील संदर्भच सभा जिंकण्याचे सूत्र कसे असावे, हे सांगणारे होते.
शरद जोशी यांच्या संघटनेत सामील झालो. नंतर राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली विदर्भात काम सुरू केले. सोयाबीन, कापूस पिकाला दर मिळावा, यांसह विविध कारणांसाठी आंदोलने केली. गुन्हे दाखल झाले. तुरुंगात गेलो. माझी केस लढणाऱ्या वकील मुलगीबरोबर प्रेमविवाह केला. जो कोणी अन्याय करतोय, त्याला वटणीवर आणण्यासाठी प्रयत्न केला, करतोय असे ठामपणे भाषणात सांगत सभेला भावनिक करताना तडिपार झाल्याचे चित्र उभे करतात. पण, हे सर्व शेतकऱ्यांसाठी म्हटल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट होत होता.
खासदार राजू शेट्टी यांची प्रेरणा घेऊन शेकडो मैल अंतराची निर्धार यात्रा पूर्ण केली. यामुळे आत्मविश्वास निर्माण झाला. शेतकऱ्यांना आपला वाटू लागलो. लोकांच्या आग्रहाखातर लोकसभा, विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. महायुतीतील निर्णयाप्रमाणे संघटनेला बुलढाणा, चिखलीची जागा मिळाली नाही. परंतु, बंडखोरी केली नाही.
लाल दिव्याची गाडी
लाल दिव्याची गाडी मिळाली अन् राज्यमंत्र्यांचा दर्जा प्राप्त झाला. सत्तास्थान मिळालं; पण हे कसं मिळालं हे सांगताना त्यांनी आपल्या सभेतून रोमांचकारी प्रसंग सांगितले. त्यांच्या बोलण्याला विदर्भाच्या शैलीचा सूर असल्याने शेतकऱ्यांना खासकरून तरुण शेतकऱ्यांना त्याचे अप्रूप वाटलं.
अन्यायाविरुद्ध लढणे ही सवय शालेय जीवनापासून लागली. त्यातूनच संघर्ष केला. एक वर्ष घरापासून दूर राहिलो. रस्त्याकडेला चहाची टपरी टाकली. तरुणांची संघटनात्मक फळी उभी केली. बुलढाण्याजवळीळ सावळा हे छोटेसे गाव. तिथे सुंदरखेड ही गु्रप ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन केली, अशी भाषणाची सुरुवात होती.